कर्करोग रुग्णालय प्रलंबितच

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 November 2019

गरीब रुग्णांसाठी कर्करोग निदान हॉस्पिटल सुरू करण्याची महापालिकेची योजनाही यंदाही फसली आहे. हे हॉस्पिटल खासगीकरणातून उभारण्यावर महापालिकेतील पदाधिकारी-अधिकाऱ्यांमध्ये दुमत असल्याने ही योजना रखडल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे- गरीब रुग्णांसाठी कर्करोग निदान हॉस्पिटल सुरू करण्याची महापालिकेची योजनाही यंदाही फसली आहे. हे हॉस्पिटल खासगीकरणातून उभारण्यावर महापालिकेतील पदाधिकारी-अधिकाऱ्यांमध्ये दुमत असल्याने ही योजना रखडल्याचे स्पष्ट झाले आहे. हॉस्पिटलला मंजुरी मिळवून वर्ष झाले तरी जागेची पाहणी, प्रस्ताव आणि चर्चेपलीकडे महापालिकेने कार्यवाही केली नाही. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

शहरातील कर्करोगाच्या रुग्णांची संख्या लक्षात घेता त्यांना अल्पदरात आरोग्य सेवा पुरविण्यासाठी कर्करोग रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव होता. महापालिकेनेच ही सुविधा उभारण्याची मागणी नगरसेवकांनी लावून धरली होती. तर पुरेसे अधिकारी-कर्मचारी नसल्याने खासगीकरणातून योजना राबविण्याचा प्रशासनाचा आग्रह आहे. त्यावरून मूळ प्रस्तावावर अभिप्राय येताच महिला व बालकल्याण खात्याने  गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये प्रस्ताव मंजूर करून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची सूचना आरोग्यप्रमुखांना केली होती. त्यामुळे गरीब रुग्णांना अल्पदरात उपचार मिळण्याची आशा होती. मात्र नेहमीच खासगीकरणाला प्राधान्य देणाऱ्या प्रशासनानेही या योजनेच्या अंमलबजावणीकडे काणाडोळा केला आहे. 

मंजुरीनंतर सहा महिन्यांत हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय मंजुरीदरम्यानच्या चर्चेत झाला होता. त्यासाठी आवश्‍यक ती यंत्रणाही उपलब्ध करण्यासाठी निधीची सोय होती. मात्र केवळ खासगीकरण करण्याच्या हट्टापायी योजनेची अंमलबजावणी केली जात नाही.
- राजश्री नवले, नगरसेविका  

शुक्रवार पेठेतील जागा निश्‍चित
कर्करोगाच्या रुग्णांना उपचाराकरिता शहरी गरीब योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांनी मदत केली जाते. मात्र उपचार आणि त्यावरील खर्च लक्षात घेता, स्वतंत्र हॉस्पिटल सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. गरीब आणि गरजू रुग्णांसाठी शहराच्या मध्यवर्ती भागातील जागेत हॉस्पिटल सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार शुक्रवार पेठेतील मालती काची हॉस्पिटलच्या इमारतीतील जागा निश्‍चित करण्यात आली आहे.

कर्करोग हॉस्पिटलचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्तांकडे दिला आहे. त्याशिवाय, जागेची पाहणी करून ती ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली असून, त्याबाबत मिळकतकर विभागाला पत्रही पाठविले आहे. हे हॉस्पिटल लवकर सुरू करणार आहोत.
- डॉ. अंजली साबणे, सहायक आरोग्यप्रमुख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cancer hospital