#HealthIssue  कर्करोगग्रस्त महिलांना मिळणार मोफत उपचार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

गरीब कुटुंबातील गर्भवतींच्या प्रसूतीतील गुंतागुंत सोडविण्यासाठी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ची यंत्रणा उभारल्यानंतर महापालिकेच्या प्रसूतिगृहांत आता महिलांमधील स्तन, गर्भाशयाच्या (मुख) कर्करोगाचे निदान करण्याचीही सोय उपलब्ध होणार आहे.

पुणे - गरीब कुटुंबातील गर्भवतींच्या प्रसूतीतील गुंतागुंत सोडविण्यासाठी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ची यंत्रणा उभारल्यानंतर महापालिकेच्या प्रसूतिगृहांत आता महिलांमधील स्तन, गर्भाशयाच्या (मुख) कर्करोगाचे निदान करण्याचीही सोय उपलब्ध होणार आहे. त्याकरिता खासगी आणि महापालिकेच्या स्त्रीरोगतज्ज्ञांना एकत्र आणून प्रसूतिपूर्व तपासण्या करण्यात येणार असून, कर्करोगाच्या निदानानंतर वेळेत व मोफत उपचार करण्यात येणार आहेत. पालिकेच्या विविध रुग्णालयांतील १८ प्रसूतिगृहांत कर्करोग निदान केंद्र उभारण्याचे नियोजन आहे.

महापालिकेच्या प्रसूतिगृहांत मोफत प्रसूतीची सोय असल्याने गरीब कुटुंबांमधील महिलांची संख्या वाढत आहे. दरवर्षी सुमारे १८ ते २० हजार महिलांची प्रसूतीसाठी नोंदणी होते. त्यातील ८० टक्के महिला दाखल होतात. त्यातील काही महिलांमध्ये इतरही आजार विशेषत: गर्भाशय, स्तनाचा कर्करोग असल्याचे निष्पन्न झाले आहे. अशा आजारांचे निदान खर्चीक असल्याने महिलांना ते परवडत नाही. त्यामुळे महिलांना वैद्यकीय उपचारांपासून लांब राहावे लागते. अशा महिलांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने कर्करोग निदान केंद्र सुरू करण्याची योजना आखली आहे.

चाळिशीनंतरच्या महिलांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग आढळून येतो. तर, स्तनाचा कर्करोगही होत असल्याचे दिसून येत आहे. अशा महिलांना वेळेत उपचाराची गरज असते. त्यासाठी प्रसूतीस येणाऱ्या प्रत्येक महिलेच्या गर्भाशयाची तपासणी करण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी सांगितले.

स्त्रीरोगतज्ज्ञांची अपुरी संख्या
महापालिकेच्या प्रसूतिगृहांत येणाऱ्या बहुतांश महिलांचे सिझेरिअन करावे लागते. मात्र, अपुऱ्या स्त्रीरोगतज्ज्ञांमुळे इतक्‍या महिलांना दाखल करून घेणे शक्‍य होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासाठी सर्व प्रसूतिगृहे ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ने जोडली आहेत. त्यामुळे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेऊन सिझेरिअन आणि प्रसूतीदरम्यानची अन्य गुंतागुंत सोडविली जाते, असे महापालिकेचे सहायक आरोग्यप्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cancer women get free treatment