Vidha Sabha 2019 : पुण्यात भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी

Vidha Sabha 2019 : पुण्यात भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी

विधानसभा 2019
सत्ताधारी भाजपकडे सर्व आठही जागा असल्याने त्यांच्याकडे इच्छुकांची भाऊगर्दी आहे, तर शिवसेनेतूनही इच्छुक मोठ्या प्रमाणात आहेत. पण, त्यांच्या वाट्याला जागा कोणत्या येणार, हा प्रश्‍न आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीतूनही आपापले गड पुन्हा जिंकण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीवेळी वंचित विकास आघाडीने मारलेल्या मुसंडीने त्यांचे बळ वाढले आहे.

भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा नुकतीच पुण्यात येऊन गेली आणि विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीच्या हालचालींना वेग आला. शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांत भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. भाजपच्याच एका अंतर्गत सर्वेक्षणात कोथरूड, पर्वती, खडकवासला आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ ‘सेफ’; तर कसबा, कॅंटोन्मेंट, शिवाजीनगर आणि हडपसर या मतदारसंघांमध्ये विशेष लक्ष द्यावे लागेल, असे निदर्शनाला आले आहे. त्यामुळे या मतदारसंघांत नवे चेहरे देणार का, याबद्दल कुतूहल आहे. त्यामुळे इच्छुकांच्या आकांक्षांना पालवी फुटली आहे.

भाजपमध्ये सर्वेक्षणाला विशेष महत्त्व आहे. त्यात विद्यमान आमदारांनी केलेली कामे, त्याची प्रतिमा, लोकप्रियता आदींचा विचार केला  जातो. भाजपची एकहाती सत्ता असली, तरी सगळे काही आलबेल आहे, असेही नाही. काही आमदारांच्या कामगिरीबद्दल मुख्यमंत्र्यांनीच खासगीत नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जाते. त्यांना द्यावयाच्या पर्यायांबद्दल सर्वेक्षणातून  आलेल्या निष्कर्षांच्या आधारे अभ्यासही तयार ठेवलेला आहे. म्हणूनच, विद्यमानांना सर्वेक्षणाची धास्ती वाटत आहे आणि इच्छुक  उमेदवारांची भिस्तही सर्वेक्षणावरच आहे. कसब्यातील आमदार गिरीश बापट आता खासदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात तर नवा चेहरा येईलच. 

शंभरावर इच्छुक
शहरातील आठही विधासनभा मतदारसंघांतून तब्बल १०२ जणांनी उमेदवारीसाठी भारतीय जनता पक्षाकडे इच्छा व्यक्त केली आहे. फडणवीस यांना शहरातील राजकारणाची आणि महापालिकेतील कारभाराची बारकाईने माहिती आहे. कोणत्या आमदारांनी काय काम केले आहे, याचीही त्यांना जाणीव आहे. त्यामुळे उमेदवारी निश्‍चित करताना त्यांचा ‘रोल’ सर्वाधिक महत्त्वाचा ठरेल. शिवसेनेला कोथरूड, हडपसर आणि शिवाजीनगर मतदारसंघ हवे आहेत. परंतु, विद्यमान आमदारांच्या जागांना हात लावायचा नाही, असे युतीच्या नेत्यांत ठरल्याचे सांगितले जाते. परिणामी, काही जागांची अदलाबदली झाली, तरच शिवसेनेला शहरातील एक-दोन जागा मिळू शकतील, अशी शक्‍यता आहे.

आघाडीत चर्चेचे गुऱ्हाळ
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपाची चर्चा मुंबईत पोचली आहे. काँग्रेसकडून ५४, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५२ इच्छुक आहेत. सक्षम उमेदवार असल्यामुळे कॅंटोन्मेंट, कसबा, शिवाजीनगर आणि पर्वती मतदारसंघ काँग्रेसला हवे होते; तर राष्ट्रवादीला हडपसर, खडकवासला, वडगाव शेरी, पर्वती मतदारसंघ हवे आहेत. आघाडीच्या नेत्यांमधील चर्चेत कळीचा ठरलेला पर्वती मतदारसंघ राष्ट्रवादीने मिळविला आहे, तर कोथरूड मतदार संघ मित्रपक्षांना देऊ असे म्हटले आहे. मात्र, मित्रपक्ष   म्हणजे मनसे असावा असा कार्यकत्कर्त्यांचा होरा आहे. काँग्रेसला तीन जागा देऊन आपण चार जागा लढवू, अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भूमिका नेत्यांपर्यंत पोचविली गेली आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शहरात 
कोथरूड, हडपसर आणि कसबा विधासनभा मतदारसंघातल्या काही भागांत प्रभाव आहे. तेथे त्यांच्याकडे उमेदवारही आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीत मनसेला सामावून घेतले जाईल, अशी चर्चा होती. परंतु, याला आता पूर्णविराम मिळाला आहे. परंतु, निवडणूक लढवायची की नाही, याचा निर्णय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अद्याप घेतलेला नाही. त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते संभ्रमात आहेत. ठाकरेंच्या भूमिकेबद्दल पुण्यात औत्सुक्‍य आहे.

‘वंचित’कडे लक्ष
लोकसभा निवडणुकीत भाजपला पुण्यात विक्रमी मताधिक्‍य मिळाले असले, तरी वंचित विकास आघाडीच्या उमेदवाराला शिवाजीनगर, वडगाव शेरीमध्ये मिळालेली मते दुर्लक्ष करता येण्यासारखी नाहीत. वडगाव शेरी मतदारसंघातून ‘वंचित’ने डॅनियल लांडगे यांना उमेदवारी जाहीर करून प्रचारही सुरू केला आहे. तर एमआयएमने कॅंटोन्मेंटमध्ये हीना मोमीन यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे येथील निवडणूक चुरशीची होऊ शकते. भाजप, काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्यास इच्छुक किमान या तीन मतदारसंघांत ‘वंचित’चा आसरा घेऊ शकतात.

तीन शहराध्यक्ष रिंगणात?
काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे यंदा निवडणूक रिंगणात असतील. तुपे यांनी पक्षाकडे अर्ज भरून मुलाखत दिलेली नसली तरी पक्षाने सांगितले तर निवडणूक लढवू, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी निवडणूक लढविली तर यंदा प्रथमच एकाच वेळी तीन शहराध्यक्ष निवडणूक रिंगणात दिसतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com