"पोर्टफोलिओ'साठी लगबग

सुवर्णा चव्हाण, सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

पुणे - पांढऱ्या कपड्यात-जॅकेटमध्ये मतदारांशी हस्तांदोलन करणारे, रंगीबेरंगी साड्यांमध्ये खास पोझ देणारे, मिरवणुकीत सहभागी झालेले इच्छुक...छायाचित्रकारांसमोर अशा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची आता गर्दी होते आहे. इच्छुक स्वतःची हसरी छबी काढण्यात गुंतले असून, आपल्या विविध "पोझ'मधील मुद्राही बॅनरवर झळकाव्यात, यासाठी खटपट करीत आहेत.

पुणे - पांढऱ्या कपड्यात-जॅकेटमध्ये मतदारांशी हस्तांदोलन करणारे, रंगीबेरंगी साड्यांमध्ये खास पोझ देणारे, मिरवणुकीत सहभागी झालेले इच्छुक...छायाचित्रकारांसमोर अशा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची आता गर्दी होते आहे. इच्छुक स्वतःची हसरी छबी काढण्यात गुंतले असून, आपल्या विविध "पोझ'मधील मुद्राही बॅनरवर झळकाव्यात, यासाठी खटपट करीत आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांनी खास तयारी केली असून, त्याचाच एक भाग म्हणून इच्छुक निवडणुकीआधी व्यावसायिक छायाचित्रकारांकडून खास फोटोशूट करून घेत आहेत. छायाचित्रकारांकडे इच्छुकांची गर्दी वाढते आहे. ही छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. महिनाभर आधीपासूनच "पोर्टफोलिओ'सह रॅली, प्रचार मोहिमा आणि भेटीगाठींची छायाचित्रे काढून घेतली जात आहेत. त्यात पोर्टफोलिओसाठी इच्छुक 6 ते 20 हजार रुपये खर्च करत आहेत. स्टुडिओबाहेर छायाचित्रे काढण्यापेक्षा स्टुडिओमधील फोटोशूटला जास्त मागणी असून, पोर्टफोलिओची किमान 150 छायाचित्रे, तर फोटोशूटद्वारे 200 छायाचित्रे इच्छुकांना दिली जात आहेत.

याबाबत छायाचित्रकार योगेश गोलांडे म्हणाले, ""उमेदवारांना हव्या त्या मुद्रांमध्ये आणि हव्या त्या पेहरावात पोर्टफोलिओ काढून देण्यात येत आहेत. काहींनी तर विजयी झाल्यानंतरचेही फोटोशूट करून घेतले आहेत. फ्लेक्‍ससाठीची काही छायाचित्रे, रॅलीतील छायाचित्रे, भेटीगाठीसाठीची छायाचित्रे, प्रचारासाठीची छायाचित्रे आणि विजयानंतरच्या जल्लोषाची छायाचित्रे इच्छुकांनी आधीच काढून घेतली आहेत.''

छायाचित्रकार प्रसन्न देशपांडे म्हणाले, ""सोशल मीडिया आणि प्रचारासाठी असे पोर्टफोलिओ आणि फोटोशूट करून घेतले जात आहेत. काही निवडक फोटोसाठी इच्छुक हजारो रुपये देत आहेत. आम्ही दोन ते तीन जणांची टीम मिळून अशी छायाचित्रे काढून देत आहोत. त्या छायाचित्रांना खास पद्धतीने संपादित करून इच्छुकांना ती देण्यात येत आहेत. एखाद्या बाहेरच्या ठिकाणावरही फोटोशूट करून घेतले जात आहे. आतापर्यंत काही इच्छुकांच्या फोटोशूटचे काम पूर्णही झाले आहे.''

फोटोशूटसाठी खास पेहराव
रंगीबेरंगी साड्या, पक्षाचे चिन्ह असलेले बॅच आणि उपरणे अशा पेहरावात महिला इच्छुक फोटोशूट करून घेत आहेत, तर पुरुष इच्छुकांचा कल कुर्ता-पायजमा, खादी कुर्ता-शर्ट आणि जॅकेट अशा पेहरावासह हटके स्टाइल आणि विविध पोझमध्ये फोटोशूट करून घेण्याकडे आहे. विशेष म्हणजे तरुण उमेदवार तरुणांना आकर्षित करण्यासाठी जीन्स-टी-शर्टमध्येही फोटोशूट केले जात आहे.

ग्राफिक डिझायनिंग
पक्षाचे चिन्ह, उपरणे आणि विशिष्ट पेहराव केलेला इच्छुक आणि नियोजित विकासकामे, अहवालातील घोषणा किंवा संदेश असलेली छायाचित्रे सोशल मीडियावर झळकत आहेत. पोर्टफोलिओ आणि फोटोशूटमधील काही निवडक छायाचित्रे त्यासाठी खास ग्राफिक डिझायनरकडून संपादित करून घेतली जात आहेत. हेच खास फोटो प्रचार आणि सोशल मीडियावरही फिरत आहेत.

Web Title: candidate portfolio