esakal | कार्ड क्‍लोनिंगद्वारे एटीएममधून पैसे काढायचे; नायझेरीयन नागरीकांना अटक

बोलून बातमी शोधा

atm
कार्ड क्‍लोनिंगद्वारे एटीएममधून काढायचे पैसे; नायझेरीयन नागरीकांना अटक
sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

पुणे- एटीएममध्ये स्किमर व कॅमेरे बसवून त्याद्वारे नागरीकांच्या बॅंक खात्याची गोपनीय माहिती चोरुन बनविलेल्या बनावट एटीएम कार्डद्वारे नागरीकांचे पैसे लुटणाऱ्या नायझेरीयन नागरीकांना सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून बनावट एटीएम कार्ड, एटीएम कार्ड रिडर, सॉफ्टवेअर सिडी असा मुद्देमाल जप्त केला. ननम गॅब्रीअल चुकुवूबुका (रा. औंध मिलटरी स्टेशन जवळ, पिंपळे निलख, मुळ रा. नायझेरीया), बशीर ऊर्फ लुकास विल्यम ऊर्फ ओमोईके गॉडसन (रा. जगताप डेअरीजवळ, रहाटणी, मुळ रा. नायझेरीया) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर पोलिसांकडे 28 एप्रिल रोजी एक तक्रार दाखल झाली होती. संबंधीत तक्रारदाराने त्यांच्या एटीएमकार्डचा वापर केलेला नसतानाही त्यांच्या बॅंक खात्यातील एक लाख 10 हजार रुपयांची रक्कम सलग तीन वेळा काढण्यात आली होती. संबंधीत व्यवहार हे नाशिक फाट्यावरील कासारवाडी येथील धर्मवीर संभाजी अर्बन बॅंकेच्या एटीएम सेंटरमधून सायंकाळी पाच ते सहा या वेळेत झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, सायबर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता. त्यानंतर सायबर पोलिसांनी तक्रारदारा समवेत जाऊन 29 एप्रिल रोजी संबंधीत एटीएमभोवती सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास सापळा लावला. त्यावेळी दुचाकीवरुन आलेला एक नायझेरीयन व्यक्ती एटीएममध्ये जाऊन बनावट एटीएम कार्डचा वापर करून पैसे काढत असताना पोलिसांच्या निदर्शनास आले.

हेही वाचा: पुणे मनपातील अधिकाऱ्यांची 'रंगीत ओली पार्टी'; पोलिसांच्या छाप्यात 9 जण अटकेत

पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे दोन बनावट व दोन विविध बॅंकांचे एटीएम कार्ड, तसेच अन्य दोन नागरीकांची नावे असलेली एटीएम कार्ड पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केली. त्यापैकी एका बनावट एटीएम कार्डवर तक्रारदारांच्या एटीएम कार्डचा पीन क्रमांक लिहीला होता, तर दुसऱ्या कार्डवर वेगळा पीन क्रमांक लिहीला होता. त्याची अधिक चौकशी केल्यानंतर त्यास बनावट एटीएम कार्ड पुरविणाऱ्याची माहिती त्याने दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुरूवारी पिंपरी-चिंचवडमधील जगताप डेअरी परिसरातील एका हॉटेलमधून गॉडसन यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून वेगवेगळ्या बॅंकांची 10 एटीएम कार्ड, बनावट एटीएम कार्ड, एटीएम कार्ड रिडर, सॉफ्टवेअर सिडी असा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही आरोपींविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डि.एस.हाके, पोलिस निरीक्षक कुमार घाडगे, पोलिस उपनिरीक्षक अनिल डफळ यांच्या पथकाने ही कामगिरी केली.