मराठा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस दाखला व ईडब्ल्यूएस मधून प्रवेशाची संधी मिळावी

मिलिंद संगई
Saturday, 7 November 2020

ज्यांच्याकडे राज्य शासनाने दिलेला सेंट्रल ईडब्ल्यूएस दाखला आहे, तो दाखला राज्यातील प्रवेश प्रक्रीयेसाठी ग्राह्य धरावा. ज्या एसईबीसी विद्यार्थ्यांनी या पूर्वीच ओपन कॅटेगरीतून केली असेल त्यांना संबंधित यंत्रणेद्वारा अनलॉकिंग करुन प्रवर्ग बदलण्याची संधी 12 नोव्हेंबर पूर्वी देण्यात यावी, अशी मागणी या पत्रात केली आहे. 

बारामती (पुणे) : यंदाच्या वैद्यकीय प्रवेश प्रक्रीयेमध्ये मराठा (एसईबीसी) विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस दाखला व ईडब्ल्यूएसमधून प्रवेशाची संधी उपलब्ध करुन देण्याबाबत करिअर मार्गदर्शक हेमचंद्र शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले आहे. 

यात त्यांनी नमूद केले आहे की, एसईबीसी मराठा विद्यार्थ्यांना वैदयकीय प्रवेशात आरक्षण नाही. केवळ मराठा म्हणून ईडब्ल्यूएस दाखलाही दिला जात नाही, त्यांच्यासाठी तातडीने दाखले देण्याची यंत्रणा कार्यान्वित करावी. राज्यातील आरोग्य विज्ञान शाखेतील प्रवेशासाठी सीईटी परिक्षेसाठी नावनोंदणी 12 नोव्हेंबरपर्यंत, पहिली फेरी 15 नोव्हेंबर व प्रवेश घेण्याची अंतिम मुदत 20 नोव्हेंबर ही आहे. 

इतक्या कमी कालावधीत ईडब्ल्यूएस दाखला मिळणे शक्य नाही, त्यामुळे एसईबीसी मराठा विद्यार्थ्यांना प्रतिज्ञापत्रकाद्वारे नावनोंदणी व प्रवेश देण्यात यावा, त्यानंतर दाखले सादर करण्यासाठी किमान ३० दिवसांची मुदत द्यावी. ज्यांच्याकडे राज्य शासनाने दिलेला सेंट्रल ईडब्ल्यूएस दाखला आहे, तो दाखला राज्यातील प्रवेश प्रक्रीयेसाठी ग्राह्य धरावा. ज्या एसईबीसी विद्यार्थ्यांनी या पूर्वीच ओपन कॅटेगरीतून केली असेल त्यांना संबंधित यंत्रणेद्वारा अनलॉकिंग करुन प्रवर्ग बदलण्याची संधी 12 नोव्हेंबर पूर्वी देण्यात यावी, अशी मागणी या पत्रात केली आहे. 

राज्याच्या ईडब्ल्यूएस दाखल्यासाठी फक्त पालकाचे कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असावे अशी अट आहे. ज्याअर्थी विद्यार्थी एसईबीसी प्रवर्गात आहे, त्याच्याकडे एसईबीसीचा दाखला आहे. त्याच्याकडे नॉन क्रिमिलियर आहेच, म्हणजेच त्याचे उत्पन्न आठ लाखांहून कमी आहे, त्यामुळे तो विद्यार्थी ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र मिळण्यासाठी पात्र आहे. तरीही केवळ तांत्रिक कारणांमुळे शासन आदेश नसल्याने कोणत्याही तहसिल कचेरीत मराठा असल्याने ईडब्ल्यूएस दाखले मिळत नाहीत. ही परिस्थिती म्हणजे विद्यार्थ्यांची अवस्था ना इकडे ना तिकडे अशी विचित्र झालेली असून राज्यातील असंख्य विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शिंदे यांनी या पत्राद्वारे केली आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Career Guide Hemchandra Shinde has written a letter to the Chief Minister regarding the provision of EWS Certificate and EWS to the students