रखवालदारांची "मेगा भरती'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

महापालिकेच्या कार्यालयांसह, मालमत्तांच्या सुरक्षेसाठी एक हजार 350 जणांची ठेकेदाराच्या माध्यमातून "मेगा भरती' केली जाणार आहे, त्यासाठी स्थायी समितीने 22 कोटी 7 लाख 21 हजार रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली.

स्थायीकडून 22 कोटींच्या खर्चाला मान्यता
पुणे - महापालिकेच्या कार्यालयांसह, मालमत्तांच्या सुरक्षेसाठी एक हजार 350 जणांची ठेकेदाराच्या माध्यमातून "मेगा भरती' केली जाणार आहे, त्यासाठी स्थायी समितीने 22 कोटी 7 लाख 21 हजार रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली.

महापालिकेची क्षेत्रीय कार्यालये, उद्याने, स्मशानभूमी, रुग्णालये, जलतरण तलाव, सांस्कृतिक केंद्रे, सामाजिक मंदिरे, प्राणी संग्रहालये, मालमत्ता, पाणीपुरवठा, पाण्याच्या टाक्‍या, सुरक्षा विभाग, कचरा हस्तांतरण केंद्र याठिकाणची सुरक्षा ही पुणे महापालिकेची जबाबदारी आहे. तेथे 24 तास देखरेख करण्यासाठी रखवालदारांची गरज आहे. त्यासाठी त्यांना "बहुउद्देशीय कामगार' या नावाखाली ठेकेदारांना काम दिले जाते.

सद्यःस्थितीत स्थायी 394 कर्मचारी आहेत, त्यापैकी 249 पदे रिक्त आहेत.

ठेकेदाराकडून कंत्राटी सुरक्षारक्षक (बहुउद्देशीय कामगार) नियुक्त केले जात आहेत, त्यासाठी पालिकेने निविदा मागविली. त्यात सैनिक इंटेलिजन्स ऍण्ड सिक्‍युरिटी प्रा. लि यांची निविदा सर्वात कमी दराची होती. प्रत्येक महिन्याला 13 हजार 624 या दराप्रमाणे एक कामगार अशा प्रकारे 1 हजार 340 जण एका वर्षासाठी पुरविले जातील. त्यासाठी 22 कोटी 7 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये सरकारने किमान वेतन दरात व भत्त्यांच्या रकमेत वाढ केली तर तसे वाढीव बिलही ठेकेदाराला मिळणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Caretaker Mega Recruitment in Municipal