महाराष्ट्रातील अडीच हजार वर्षांपूर्वीचा अनमोल ठेवा दुर्लक्षित! 

Caves in Junnar taluka
Caves in Junnar taluka

जुन्नर हे महाराष्ट्रातील प्राचीन शहरांपैकी एक शहर आहे. दोन हजार वर्षांपूर्वीच्या सातवाहन साम्राज्याची आर्थिक राजधानी असलेले हे शहर आहे. तालुक्‍यात दोन हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील सर्वांत जास्त बौद्ध लेण्या कोरलेल्या आहेत. तालुक्‍याला पर्यटनाचा दर्जा मिळाला असला, तरी या लेण्यांच्या विकासासाठी कोणतेही प्रयत्न केलेले दिसत नाहीत. देश-विदेशातील अनेक पर्यटक लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी येत असतात. मात्र, पुरातत्व विभागाकडून या लेण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. 

जुन्नर तालुक्‍यात सुमारे २२० लेण्या आहेत. त्या जुन्नर शहरापासून काही अंतरावर शिवनेरी, तुळजा, मानमोडी, लेण्याद्री व सुलेमान या गटात विभागलेल्या आहेत. तुळजा लेणी ही महाराष्ट्रातील आद्य लेण्यांपैकी एक आहे. या लेणीमध्ये असलेल्या स्तुपाची संरचना अन्यत्र कोठेही आढळून येत नाही. अंबा- अंबिका लेणी कोरण्यासाठी गुजरात येथील लाकडाच्या व्यापाऱ्यांनी, तसेच भूत लेणी व शिवनेरी, लेण्याद्रीच्या काही लेणी कोरण्यासाठी ग्रीक लोकांनी दान दिल्याचे उल्लेख शिलालेखात आढळतात.

भारतीय कला संस्कृतीच्या ऐतिहासिक परंपरेत बौद्ध कला संस्कृती अडीच हजार वर्षांपासून प्रतिनिधित्व करीत आहे. बौद्ध लेणी स्थापत्य, चित्रकला, शिल्पकला, मूर्तिकलेचा भारताच्या संस्कृतीवर ठसा आहे. ही कला भारताची अनुपम कला व समृद्ध बौद्धसंस्कृतीचे दर्शन 

घडविते. काळाच्या ओघात या कलासंस्कृतीचे विद्रूपीकरण झाले आहे. ही असामान्य कलासंस्कृती टिकली पाहिजे. हा भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. सरकारने बौद्ध लेणी स्थापत्याचे संरक्षण, संवर्धन केले पाहिजे.

परदेशी पर्यटकांनाही आकर्षण
परदेशी पर्यटक जुन्नरमध्ये आणण्यासाठी या लेण्यांचा विकास करणे आवश्‍यक आहे. सरकारने जुन्नर येथील बौद्ध लेण्या अजंठा लेण्यांच्या धर्तीवर विकसित करायला हव्यात. असे केल्यास जगातील बौद्ध राष्ट्रांचे जुन्नरमध्ये पर्यटन वाढेल. त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘युनेस्को’ची मदत घेता येईल. बौद्ध राष्ट्रांची आर्थिक मदत होईल. त्यातून जुन्नरकरांच्या उत्पन्नाचा स्रोत वाढण्यास मदत होईल. 

शिवनेरी लेण्या अत्यंत दुर्लक्षित 
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर चारही बाजूंनी ६० बौद्ध लेणी आहेत. तसेच, दोन हजार वर्षांपूर्वी केलेले रंगकाम या लेण्यांमध्ये पाहायला भेटते. या लेण्यांची स्थापत्य कलाही अतिशय उत्तम आहे. शिवनेरी किल्ल्याचा विकास करताना या लेण्यांकडे मात्र सरकारने दुर्लक्ष केल्याचे जाणवते. दिशादर्शक फलकांचा अभाव असून, लेणीवर जाण्यासाठी योग्य मार्ग नाहीत. पडझड झालेल्या लेण्यांच्या संवर्धनासाठी कोणतेही पाऊल उचलले जात नाही.

काय करता येईल...
जुन्नरमध्ये प्रवेश करण्याच्या ठिकाणी या लेण्यांची माहिती असलेले कोणतेही दिशादर्शक फलक लावलेले नाहीत. 
जाण्यासाठी योग्य मार्ग नाहीत. जंगलातून लेणीवर मार्ग काढत जावे लागते. 
लेण्यांच्या छताला अनेक मधमाश्‍यांचे पोळे असतात. यापूर्वी लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या अनेक देशविदेशांतील पर्यटकांवर मधमाश्‍यांचे हल्ले झालेले आहेत. असे असतानाही पुरातत्व विभागाने या ठिकाणी कोणतीही सूचना लावलेली नाही. 
लेण्यांच्या इतिहासाची माहिती दर्शविणारे फलक नाहीत. 
पडझड झालेल्या लेण्यांचे संवर्धन करावे. 

जुन्नरमधील लेण्यांच्या संवर्धन व विकासासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. परंतु, निधीची कमतरता असल्यामुळे काम करणे अशक्‍य आहे.
 - बाबासाहेब जंगले, संरक्षक सहायक, जुन्नर,केंद्रीय पुरातत्त्व विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com