
Pune Metro: "मेट्रो भाड्याने मिळेल"; पुणे मेट्रोच्या आवाहनानंतर नेटकरी चिडले
पुणे मेट्रोने एक नवीन पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे आता नेटकरी मेट्रोवर चांगलेच चिडले आहेत. वाढदिवस, अॅनिवर्सरी, गेट-टुगेदर किंवा इतर सेलिब्रेशन आता नागरिकांना मेट्रोमध्ये सेलिब्रेट करता येणार आहेत. या पोस्टवर नेटकऱ्यांनी काही खास पुणेरी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पुणे मेट्रोने एका लहान मुलाच्या वाढदिवसाचे फोटो शेअर केले आहेत. याबद्दल पुणे मेट्रोने पोस्टही केली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, चिमुकल्या 'ग्यांश' हयाचा चौथा वाढदिवस #पुणेमेट्रो मध्ये कुटुंबीयांनी नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत साजरा केला. हा वाढदिवस लखवानी कुटुंबियांसाठी आनंददायी ठरला."
आपणही आपल्या आनंदाचे क्षण (वाढदिवस, ऍनिव्हर्सरी, गेटटुगेदर किंवा इतर सेलिब्रेशन) आता पुणे मेट्रोच्या `सेलिब्रेशन ऑन व्हील्स' या संकल्पनेअंतर्गत साजरे करू शकता, असं आवाहनही पुणे मेट्रोने केलं आहे. यासोबत मेट्रोने माहिती आणि संपर्कासाठी क्रमांकही दिला आहे.
यावर नेटकऱ्यांकडून चांगलेच टोले दिले जात आहेत. 'आमच्याकडे मेट्रो भाड्याने मिळेल', 'आता हनिमूनची पण सोय करा', 'नदीपात्रातल्या भागातल्या मेट्रोमध्ये श्राद्धाचीही सोय केली जाईल', अशा काही कमेंट्स पुणेकरांनी तसंच नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 'मेट्रो कशासाठी सुरू केली होती आणि आता त्यात काय चाललंय' असं म्हणत अनेकांनी आपली नाराजीही व्यक्त केली आहे.