
पुणे : खेड्यांच्या शाश्वत विकासासाठी नऊ कलमी धोरण
पुणे : खेड्यांच्या शाश्वत विकासासाठी नऊ कलमी कार्यक्रम राबविण्याचे धोरण केंद्र सरकारने निश्चित केले आहे. या नऊ कलमी कार्यक्रमाची चालू आर्थिक वर्षापासून (२०२२-२३) अंमलबजावणी करण्याच्या सूचना केंद्राने सर्व राज्यांना दिल्या आहेत. देशातील सर्व खेड्यांचा २०३० पर्यंत शाश्वत विकास करण्याचे ध्येय केंद्राने निश्चित केले आहे.राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत ही खेड्यांच्या शाश्वत विकासाची ध्येये निश्चित केली आहेत. या नवीन ध्येय निश्चितीसाठी केंद्राने राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानात (Rashtriya Gram Swaraj Abhiyan) सुधारणा केली आहे. यानुसार चालू आर्थिक वर्षापासून शाश्वत विकासाच्या ध्येयाची (सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल) पंचायतराज (Panchayati raj) यंत्रणेमार्फत प्रभावी अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
संयुक्त राष्ट्र संघाने जगातून गरिबीचे पूर्ण उच्चाटन करणे, पृथ्वीचे रक्षण करणे आणि सन २०३० पर्यंत जगातील सर्व लोकसंख्येला शांतता व समृद्धी प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने २०१५ मध्येच १७ ध्येये (गोल्स) निश्चित केलेली आहेत. ही सर्व ध्येये २०३० पर्यंत साध्य करण्याची घोषणा संयुक्त राष्ट्र संघाने केलेली आहे. या करारावर सही करणारा भारत हा प्रमुख देश आहे. यानुसार संयुक्त राष्ट्र संघाच्या १७ ध्येयांपैकी भारताने नऊ ध्येयांची निवड केली आहे. ही नऊची नऊ ध्येये पंचायतराज संस्थांकडून पूर्ण करण्याचा केंद्राचा मानस आहे. यानुसार त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्थेतील सर्वात तळात समजल्या जाणाऱ्या गावपातळीवरील ग्रामपंचायत ही पंचायतराज संस्था यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकते, अशी धारणा केंद्र सरकारची झाली आहे. त्यानुसार ही सर्व ध्येये साध्य करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने पंचायतराज संस्थांच्या खांद्यावर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
दरवर्षी २४ एप्रिल हा पंचायतराज दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने नऊ कलमी (संकल्पना) कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारने निश्चित केलेल्या एकूण नऊ संकल्पनांपैकी प्रत्येक गावाला कोणत्याही एका संकल्पनेवर काम करणे अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्याच्या ग्रामविकास विभागाने या नऊ संकल्पनांच्या आधारे खेड्यांचा शाश्वत विकास करण्याचा आदेश सर्व जिल्हा परिषदांना दिला आहे. या आदेशाची प्रत नुकतीच पुणे जिल्हा परिषदेला प्राप्त झाली आहे. ही प्रत मिळाल्याच्या वृत्ताला मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दुजोरा दिला आहे.
खेड्यांच्या शाश्वत विकासाच्या केंद्राच्या नऊ संकल्पना
आरोग्यदायी गाव
बालस्नेही गाव
जलसमृद्ध गाव
स्वच्छ आणि हरित गाव
पायाभूत सुविधायुक्त स्वयंपूर्ण गाव
सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव
सुशासनयुक्त गाव
लिंगसमभाव पोषक गाव
Web Title: Central Government Launched Nine Point Strategy For Sustainable Development Of Villages Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..