केंद्राचे पथक म्हणते, बारामतीचे हे काम देशभरात व्हावे... 

baramati
baramati

बारामती (पुणे) :  कोरोनाचा लढा देताना बारामतीत राबविलेला "बारामती पॅटर्न' देशभरात राबविला पाहिजे, असे मत बारामतीस भेट दिलेल्या केंद्रीय आरोग्य विभागाच्या पथकाने व्यक्त केले. 

बारामतीत कोरोना रोखण्यासाठी राबविलेल्या "बारामती पॅटर्न'ची पाहणी करण्यासाठी केंद्रीय आरोग्य विभागाचे पथक गुरुवारी बारामतीत आले होते. या पथकातील सदस्य डॉ. ए. के. गडपायले, डॉ. सागर बोरकर, डॉ. अंशू गुप्ता, डॉ. व्ही. रंधवा, डॉ. वसंत गोकाक यांनी येथील अक्षय आनंद कम्युनिटी सेंटरमध्ये आढावा घेतला. या वेळी कोरोनावर मात करण्यासाठी स्वयंसेवक, नगरसेवक, पोलिस कर्मचाऱ्यांची घेतलेली मदत, लोकांना घराबाहेर न पडू देता घरपोच जीवनावश्‍यक वस्तू, औषधे व किराणा सामान कसे दिले गेले, स्वयंसेवकांचे जाळे कसे उभे करण्यात आले, याबाबत पथकाला माहिती दिली गेली. 

लोकसहभाग आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून हे पथक आश्‍चर्यचकित झाले होते. ""बारामती पॅटर्नमधील लोकसहभाग महत्त्वाचा आहे. लोक जोपर्यंत सहभागी होत नाही, तोपर्यंत प्रशासनाच्या उपाययोजना तोकड्या पडतात,'' असे मत त्यांनी व्यक्त केले. 

तसेच, या सदस्यांनी स्थानिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून त्यांना काही प्रश्‍न विचारण्याचीही संधी दिली व त्यांच्या शंकांचे निरसन केले. कोरोनामुक्तीसाठी बारामतीत सुरू असलेल्या उपाययोजना अनुकरणीय असून, केंद्र सरकारला देशभरात अशा उपाययोजना राबविण्याबाबत आम्ही सूचना करू, अशी ग्वाहीही या पथकातील सदस्यांनी दिली. 

विशाल जाधव, प्रवीण बोरा, रवींद्र पांडकर, धनसिंग घाडगे, अरुण जाधव, सूर्यकांत लाळगे, सुरेश झगडे, अशोक शेवाळे, सचिन मोरे, काशिम शेख, संकेत भंडारे, राहुल नाळे, श्‍याम शेवाळे, सागर मोहिते, हिमांशू गालिंदे, निशांत शेंडगे, अरबाज बागवान, ओंकार लाळगे, शीतल मोहिते, पूजा गजाकस, आयेशा शेख, हर्ष बोरा या स्थानिक नागरिकांनी या पथकाला सादरीकरण केले. शंकर घोडे यांनी सूत्रसंचालन केले. 

अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश कडुसकर, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, सम्यक छाजेड आदी या प्रसंगी उपस्थित होते. 

केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांच्याही पुढे जाऊन अधिक बारकाईने नियोजन करत "बारामती 44' हा पॅटर्न राबवीत प्रशासनाने तीन टप्पे अधिकचे करत सुसूत्रतेने काम केलेले आहे. त्यामुळे कोरोनाला आटोक्‍यात ठेवण्यात यश मिळाले आहे. याबाबतची सविस्तर माहिती सोबत घेऊन जात आहोत. सरकारला याबाबत असा पॅटर्न देशात राबविण्याबाबत सूचना करणार आहोत. 
- डॉ. ए. के. गडपायले, सदस्य, केंद्रीय पथक


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com