कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाची बारामतीला भेट; वाचा काय घडलं?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 April 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकातील दोन सदस्यांनी आज बारामतीला भेट देत पाहणी केली.

बारामती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकातील दोन सदस्यांनी आज बारामतीला भेट देत पाहणी केली. बारामतीत प्रशासनाने राबविलेल्या बारामती पॅटर्नची माहिती घेत त्यांनी कोरोनाबाधित क्षेत्रात जाऊनही माहिती घेतली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आज दुपारी बाराच्या सुमारास हे डॉ. अरविंद अलोणी व डॉ. पी.के. सेन हे दोन केंद्रीय समितीचे सदस्य बारामतीत दाखल झाले. त्यांनी दाखल झाल्यानंतर सिध्देश्वर गल्ली परिसरात, म्हाडा कॉलनी, श्रमिकनगरला भेट दिली. त्यानंतर त्यांनी सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात दाखल होत येथील स्थितीचीही माहिती घेतली. बारामतीत कोरोनाचे सात रुग्ण सापडले होते, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात डॉ. काळे व डॉ. खोमणे यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहामध्ये प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण केले.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमर माने, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, सिल्व्हर ज्य़ुबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी योगेश कडुसकर, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील, पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील याप्रसंगी उपस्थित होते. 

दरम्यान, केंद्रीय पथकाचे सदस्य बारामतीत येणार असल्याने आज लॉकडाऊनची तीव्रता कमालीची वाढविण्यात आली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Central Team Visited Baramati on Coronavirus Issue