शरद पवारांसारख्या नेत्याला मातोश्रीवर वारंवार जावं लागणं शोभतं का?

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 7 जुलै 2020

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अनेकवेळा मातोश्रीवर गेले आहेत. गेल्या सहा महिन्यात त्यांनी किमान 4 वेळा तरी मातोश्री गाठलं आहे. शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याला असं करणे शोभत नाही, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांना डिवचले

पुणे- राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अनेकवेळा मातोश्रीवर गेले आहेत. गेल्या सहा महिन्यात त्यांनी किमान 4 वेळा तरी मातोश्री गाठलं आहे. शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याला असं करणे शोभत नाही, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांना डिवचले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी टाळेबंदीसह अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. यापुढच्या काळात जनतेला टाळेबंदी झेपणार नाही. मात्र, संसर्ग रोखण्यासाठी काळजी घ्यावी लागेल. तसेच नियम न पाळणाऱ्यावर कारवाई करावी लागेल, असं ते म्हणाले आहेत. गरीब लोकांच्या मदतीसाठी भाजप पुढाकार घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पुण्यात हातावर पोट असलेल्या लोकांना एक महिन्यासाठी नोकरी, लक्षणं नसलेल्या रुग्णांसाठी विलगीकरण सुविधा उपलब्ध करून देणे अशाप्रकारची मदत केली जाणार आहे.

का घाबरता : मुख्यमंत्री किती कोटीचा निधी देणार ते जाहीर करा : प्रसाद लाड
सारथी प्रश्नावरही चंद्रकांत पाटलांनी भाष्य केलं. विजय वडेट्टीवार म्हणाले मी राजीनामा देणार. त्यातून काय होणार? त्यापेक्षा रचनात्मक काहीतरी करा. सारथी प्रश्न मार्गी लावा. सारथीची स्वायत्तता या सरकारने काढून घेतली. ती परत देणार असं आश्वासन सरकारने दिलं होतं. त्याचं काय झालं? असं सवाल त्यांनी केला आहे.

मराठा समाज मागास आहे हे स्पष्ट आहे. आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टात आहे. तोपर्यंत ओबीसींना मिळणाऱ्या सर्व सवलती मराठा समाजाला देण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला होता. विद्यार्थांची फी भरली होती. यावर्षी हे सरकार काय करणार माहीत नाही, असं म्हणत पाटलांनी आघाडी सरकारवर टीका केला आहे. आरक्षणाची केस महाराष्ट्र सरकारने ताकदीने चालवावी. कुठल्याच परिस्थितीत स्टे मिळायला नको. या विषयात सरकारने विरोधी पक्षाला सोबत घ्यावे. चर्चा करण्यात गैर वाटून घेऊ नये, अशी पुष्टीही त्यांनी जोडली आहे.

देवेंद्र फडणवीस रोज कुठे ना कुठे फिरताहेत. त्यांना काय कोरोनाची भीती नाही का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र बाहेर पडतच नाहीत. आतापर्यंत दोनदा बाहेर पडले. मातोश्रीवर देखील ते कुणाला भेटायला तयार नाहीत. असं कसं चालेल, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chaandrakant patil criticize sharad pawar