चाकण बाह्यवळण मार्गाच्या भूसंपादनाचा तिढा सुटला

चाकण बाह्यवळण मार्गाच्या भूसंपादनाचा तिढा सुटला

Published on

चाकण, ता. २६ : चाकण बाह्यवळण मार्ग हा चाकण-शिक्रापूर तसेच पुणे-नाशिक महामार्गाला जोडणारा आहे. या प्रस्तावित बाह्यवळण मार्गाबाबत पीएमआरडीएचे अधिकारी तसेच बाधित शेतकरी यांच्यात बैठक आज पार पडली. यात बाधित शेतकऱ्यांनी या मार्गाच्या भूसंपादनाबाबत आपल्या समस्या, अडचणी सांगितल्या. प्रशासनाने या अडचणी सोडवाव्यात शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य भाव द्यावा. शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करावा, अशी मागणी करून मोजणी योग्य पद्धतीने करावी असे सांगून भूसंपादनाला होकार दिला.
रस्त्याचे काम लवकर व्हावे ते रेंगाळले जाऊ नये अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे. चाकण औद्योगिक वसाहत व परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, अपघात, शहरातील व गावातील अंतर्गत अरुंद रस्त्यांवरील रहदारीचा ताण लक्षात घेता चाकण बाह्यवळण मार्गाची मागणी ग्रामस्थांकडून अनेक वर्षांपासून सातत्याने करण्यात येत होती. चाकण शहरातील व परिसरातील कोंडी सोडविण्यासाठी चाकण-शिक्रापूर मार्ग कडाचीवाडी, मेदनकरवाडी, बंगला वस्ती पुणे-नाशिक महामार्गाला जोडणारा रस्ता महत्त्वाचा आहे.
मेदनकरवाडी (ता. खेड) येथे झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी प्रस्तावित मार्गाचा प्राथमिक आराखडा सादर केला. या बाह्यवळण रस्त्यामुळे अवजड वाहतूक गावाबाहेरून वळविणे शक्य होणार आहे. तसेच भविष्यातील शहरी विस्तार, औद्योगिक वाढ लक्षात घेऊन हा मार्ग महत्त्वाचा आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी बाधित शेतकऱ्यांनी भूसंपादनासंदर्भात योग्य प्रक्रिया राबवावी, योग्य मोबदला द्यावा, शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात तसेच बाह्यवळण मार्ग ओढ्याच्या बाजूने असावा अशी मागणी केली. काही शेतकऱ्यांनी प्रस्तावित मार्गामुळे शेतीचे विभाजन होण्याची शक्यता व्यक्त केली. त्यावर अधिकाऱ्यांनी सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.
मोजणी करून या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येईल. भूसंपादन व मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. बाह्यवळण मार्ग कडाचीवाडी, मेदनकरवाडी या भागातून ओढ्यालगत जात आहे. परंतु ओढ्याची पूररेषा निश्चित करून हा मार्ग तयार केला जाईल असे अधिकाऱ्यांनी नमूद केले.
यावेळी शेतकरी कुणबी मराठा संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब कड, सरपंच अमोल साळवे, धनंजय मेदनकर, नंदाराम भुजबळ, ॲड. संकेत मेदनकर, जगदीश मेदनकर, सुनील कड, सुभाष मेदनकर, रवींद्र मेदनकर, नवनाथ भुजबळ आदी शेतकऱ्यांनी समस्या मांडल्या. त्यावेळी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल व हा मार्ग लवकरात लवकर कसा होईल याकडे लक्ष देण्यात येईल असे सांगितले. दरम्यान पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी बाधित शेतकऱ्यांची खराबवाडीतही औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत मार्गासाठी बैठक घेतली.
या बैठकीला पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)चे कार्यकारी अभियंता शिवकुमार कुपल, पीएमआरडीएचे सिद्धार्थ सपकाळे, सहाय्यक जिल्हा निरीक्षक भूमी अभिलेख जयसिंग गाडे, भूमी संपादन अधिकारी नीता जाधव, तलाठी अनिकेत कड, ग्रामविकास अधिकारी सुभाष धोत्रे, बाधित शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

असा असेल मार्ग
लांबी अडीच किलोमीटर
रुंदी ३६ मीटर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com