

चाकण, ता. २२ : चाकण औद्योगिक पट्ट्यात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत मुदतबाह्य, खराब आणि उंदरांनी दूषित केलेला अन्नसाठा नष्ट न करता पुन्हा विक्रीसाठी आणणाऱ्या मोठ्या कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल झाल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
चाकण, आंबेठाण आणि निघोजे परिसरातील गोदामांवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नुकत्याच केलेल्या धडक कारवाईत मोठे रॅकेट उघड झाले आहे. औद्योगिक विस्तारामुळे या भागात गोदामांचे जाळे पसरले असून, येथे अन्नपदार्थांच्या साठवणुकीत नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे समोर आले आहे. स्वच्छता, योग्य तापमान आणि मुदतबाह्य मालाची विल्हेवाट यांसारख्या नियमांना केराची टोपली दाखवून कंपन्या ग्राहकांच्या जिवाशी खेळत असल्याचे ‘एफडीए’च्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांनी पोलिसात फिर्यादी दिल्या असून, त्यानुसार दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या प्रकरणात, अन्न सुरक्षा अधिकारी अभिजित झोडगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, निघोजे येथील मे. ब्लिंक कॉमर्स प्रा. लिमिटेड आणि चिखलीतील मे. वाय. के. ट्रेडर्स यांनी संगनमत करून खराब व मुदतबाह्य अन्न उत्पादने पुन्हा बाजारात विकण्याचा कट रचला. आर्थिक फायद्यासाठी त्यांनी ग्राहक आणि शासनाची फसवणूक करत नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण केला.
दुसऱ्या गंभीर प्रकरणात, अन्न सुरक्षा अधिकारी सतीश हाके यांनी रिलायन्स रिटेल लिमिटेड (आंबेठाण) आणि वाघोलीतील यासीन फूड सेंटर विरोधात फिर्याद दिली आहे. या कंपन्यांनी विल्हेवाटीसाठी आलेला कालबाह्य आणि उंदरांनी दूषित केलेला माल प्रत्यक्षात नष्ट न करता, तो नष्ट केल्याची खोटी माहिती दिली. या दोन्ही प्रकरणांमुळे परिसरातील गोदाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून, या रॅकेटमध्ये आणखी कोण सामील आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी अभिजित झोडगे यांच्या फिर्यादीवरून मे. ब्लिंक कॉमर्स प्रा. लिमिटेड व मे. वाय. के. ट्रेडर्स यांच्याविरुद्ध फसवणूक आणि नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण केल्याप्रकरणी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही या प्रकरणाचा सखोल तपास करत आहोत.
- विजय ढमाळ, वरिष्ठ निरीक्षक, दक्षिण महाळुंगे पोलिस ठाणे
रिलायन्स रिटेलवर गंभीर आरोप
आंबेठाण येथील रिलायन्स रिटेल लिमिटेडच्या गोदामात उंदरांनी कुरतडलेला आणि दूषित झालेला माल नष्ट केल्याचे भासवून त्याची परस्पर विल्हेवाट लावल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. यासीन फूड सेंटरच्या मदतीने हा कट रचण्यात आला. याप्रकरणी उत्तर महाळुंगे पोलिस ठाण्यात फसवणूक, भेसळ, गुन्हेगारी कट आणि अन्न सुरक्षा कायद्याच्या विविध कलमांखाली गंभीर गुन्हा दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी दिली.
‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’
चाकण परिसरात भेसळयुक्त खवा, मावा आणि मुदतबाह्य मालाची विक्री ही काही नवीन नाही. यापूर्वीही ‘एफडीए’ने कारवाई केली होती, मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. अनेकदा ‘एफडीए’चे संपर्क क्रमांक लागत नाहीत किंवा बंद असतात. याचाच फायदा घेऊन काही बोगस अधिकारी अन्न सुरक्षा अधिकारी असल्याचे भासवून दुकानदार, हॉटेल्स आणि गोदामांमधून हप्ते गोळा करतात. या हप्तेखोरीमुळे सर्व प्रकार दडपले जात असल्याची परिसरात चर्चा रंगली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.