चाकणमध्ये बेकायदा गोदामांचे ''मायाजाल''

चाकणमध्ये बेकायदा गोदामांचे ''मायाजाल''
Published on

चाकण, ता. २१ :  चाकणमधील जीवघेणी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना ''फ्रीहँड'' देण्यात आला असून, अतिक्रमणांवर लवकरच कारवाई होणार आहे. मात्र, परिसरात बेकायदेशीर गोदामांचे पेव फुटले असून, या गंभीर समस्येवर प्रशासन कधी कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
चाकण औद्योगिक वसाहतीच्या अनियंत्रित विस्तारामुळे परिसरात उभ्या राहिलेल्या नियमबाह्य गोदामांनी गंभीर रूप धारण केले आहे. या गोदामांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर प्रशासकीय यंत्रणा ठोस कारवाई करत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. आगामी काळात अतिक्रमणे काढली जाणार असली, तरी गोदामांच्या मूळ समस्येवर बोट ठेवण्याची मागणी जोर धरत आहे. औद्योगिक विस्तारामुळे या भागात मोठ्या प्रमाणात गोदामे उभी राहिली, मात्र त्यातील बहुतांश गोदामांमध्ये आवश्यक परवानग्या, अग्निसुरक्षा आणि पर्यावरणीय नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे.
या गोदामांमुळे पुणे-नाशिक महामार्ग, चाकण-तळेगाव, चाकण-शिक्रापूर आणि चाकण-आंबेठाण या प्रमुख मार्गांवर अवजड वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. अनेक ठिकाणी गोदामांसमोरच कंटेनर, ट्रेलर आणि टँकर उभे राहत असल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली असून अपघातांचा धोकाही वाढला आहे. अनेक गावांमध्ये रहिवासी क्षेत्राला लागूनच गोदामे थाटल्याने स्थानिक नागरिकांची आणि कामगारांची मोठी गैरसोय होत आहे. प्रशासनाने केवळ कागदोपत्री कारवाई न करता, प्रत्यक्ष पाहणी करून अनधिकृत गोदामांवर आणि दोषी मालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. गोदाम मालकांना लाखो-कोट्यवधी रुपयांचे भाडे मिळते, परंतु अंतर्गत रस्ते अरुंद ठेवल्याने वाहतुकीचा बोजवारा उडतो. तर बहुतांश गोदामे ही बेकायदा प्लॉटिंग केलेल्या किंवा परवानगी नसलेल्या खासगी जागेवर असल्याने प्रशासनाने त्यांच्या नोंदी आणि मंजुरीची तातडीने चौकशी करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

कारवाईचे काय झाले?
संयुक्त मोहीम कागदावरच: महसूल विभाग, पीएमआरडीए, ग्रामपंचायत, एमआयडीसी, अग्निशमन दल आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवणे अपेक्षित असतानाही समन्वयाअभावी ती रखडली आहे.

मंत्र्यांच्या बैठकीतील प्रश्न अनुत्तरित
उद्योग मंत्र्यांच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी बेकायदा गोदामांवर कारवाईचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, त्यानंतरही प्रत्यक्ष कारवाई कधी होणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

सरकारी दप्तरी मोजकीच नोंद
चाकण औद्योगिक वसाहत व परिसरातील गावांत अगदी हजारो गोदामे आहेत; परंतु सरकारी दप्तरी नोंदी मात्र बोटावर मोजण्या इतक्या आहेत. कुरुळी, चिंबळी, मोई, निघोजे, खराबवाडी, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, महाळुंगे, खालुंब्रे, सावरदरी, वराळे, आंबेठाण, शिंदे वासुली, भांबोली, कोरेगाव, पिंपरी, शेलू, आसखेड, वाकी खुर्द, वाकी बुद्रुक, भाम, वाघजाईनगर, बिरदवडी, चाकण, रासे या गावांत मोठ्या प्रमाणात गोदामे आहेत, त्यामुळे गोदामांचा प्रश्न गंभीर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com