दिरंगाईच्या दलदलीत उद्योगांची कोंडी

दिरंगाईच्या दलदलीत उद्योगांची कोंडी
Published on

चाकण, ता. १८ :  अधिकारी-शेतकरी वाद आणि प्रशासकीय दिरंगाईने चाकण औद्योगिक वसाहतीतील विकासाचा गळा घोटला आहे. दुसरा व पाचवा टप्पा जोडणारा कॉर्निंग इंडिया-रोहकल जंक्शन मार्ग तीन वर्षांपासून अर्धवट असल्याने औद्योगिक प्रगतीलाच ब्रेक लागला आहे, तर परिसरातील लाखो कामगार, नागरिक आणि उद्योजकांच्या सहनशीलतेचा अंत झाला असून, प्रचंड असंतोष धुमसत आहे.
चाकण औद्योगिक वसाहतीमधील वाहतुकीचा कणा ठरू पाहणाऱ्या महत्त्वाच्या मार्गाचे काम विविध कारणांमुळे थांबल्याने परिसरातील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. हा मार्ग रखडल्याने सर्व वाहतूक अरुंद आणि अतिक्रमणांनी वेढलेल्या चाकण-आंबेठाण मार्गावर वळवण्यात आली आहे. परिणामी, बिरदवडी चौकात दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत असून, अवजड वाहने, कंपन्यांच्या बसेस आणि स्थानिक नागरिकांना तासनतास खोळंबून राहावे लागत आहे.
हा मार्ग केवळ खेड आणि मावळ तालुक्यांनाच नाही, तर तळेगाव दाभाडे एमआयडीसीला चाकण औद्योगिक वसाहतीशी जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या मार्गाअभावी सर्व वाहतूक अरुंद, खड्डेमय आणि अतिक्रमणांनी वेढलेल्या चाकण-आंबेठाण मार्गावर येते. अनेक ठिकाणी हा रस्ता केवळ पंधरा-वीस फूट रुंद असल्याने अवजड वाहनांमुळे वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडतो. भविष्यात रोहकल जंक्शन ते पुणे-नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे पीएमआरडीएच्या माध्यमातून ९२ कोटी रुपये खर्चून रुंदीकरण होणार असले, तरी मुख्य मार्गाचे कामच रखडल्याने मोठ्या योजनेचा उद्देश सफल होताना दिसत नाही.
विशेष म्हणजे, आंबेठाण गावाच्या हद्दीत या मार्गाला दोन ठिकाणी ९० अंशांमध्ये वळवण्यात आले असून, यामुळे भविष्यात अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. हा मार्ग कोणाच्या फायद्यासाठी वळवला, असा प्रश्न नागरिक विचारत असून, तो सरळ करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शासनाने या गंभीर प्रश्नावर तातडीने लक्ष देऊन वाहतूक कोंडी सोडवावी, अशी मागणी उद्योजक, कामगार आणि स्थानिकांमधून होत आहे.

मार्गाची सद्यस्थिती
हा मार्ग एकूण ६.८ किलोमीटर लांबीचा असून त्याची रुंदी ७५ मीटर आहे. यापैकी ६० मीटर रुंदीचा रस्ता प्रत्यक्ष वाहतुकीसाठी वापरला जाणार आहे. आतापर्यंत सुमारे अडीच किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल, असे एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचा विरोध आणि भूसंपादन
वराळे, आंबेठाण, सोळबन, बोरदरा, गोणवडी, बिरदवडी, रोहकल या गावांतून हा मार्ग जातो. बहुतांश भूसंपादन पूर्ण झाले असले तरी, काही शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला आणि परतावा मिळालेला नाही. विशेषतः पवना धरणग्रस्त पुनर्वसित सोळबन गावातील शेतकऱ्यांचा प्रश्न प्रलंबित असल्याने कामात अडथळा येत आहे.

हा रस्ता थेट पुणे-नाशिक महामार्गाला जोडून तिथे उड्डाणपूल उभारणे आवश्यक आहे. एमआयडीसीने प्रथम पवना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत. सध्याच्या योजनेनुसार मार्ग ग्रामीण रस्त्याला जोडल्यास वाहतूक कोंडी अधिकच वाढेल.
- शरद बुट्टेपाटील, माजी सदस्य, जिल्हा परिषद

CHN26B11058

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com