

चाकण, ता. १० : अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धजन्य तणावाचा थेट फटका चाकण औद्योगिक वसाहतीला बसू लागला आहे. मध्यपूर्वेतील या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारमार्गावर अनिश्चितता निर्माण झाल्याने येथील विविध कंपन्यांतील उत्पादनावर परिणाम झाला असून, निर्यात आणि आयातीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
चाकण औद्योगिक वसाहत ही देशातीलच नव्हे तर जगातील महत्त्वाच्या औद्योगिक केंद्रांपैकी एक मानली जाते. ऑटोमोबाईल हब असलेल्या चाकण वसाहतीत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स आणि निर्याताधारित उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. मध्यपूर्वेतील तणावामुळे तेल आणि जहाजवाहतूक मार्गांवर सुरक्षेचे प्रश्न निर्माण झाले असून मालवाहतुकीला विलंब होत आहे. याचा थेट परिणाम कंपन्यांच्या उत्पादन साखळीवर (सप्लाय चेन) होत आहे. अनेक उद्योगांना आवश्यक असलेला कच्चा माल, इलेक्ट्रॉनिक घटक आणि विशेष धातू परदेशातून आयात केले जातात, ज्याच्या पुरवठ्यात आता मोठी खीळ बसली आहे. मध्यपूर्वेतील बंदरांवर मालवाहतुकीचा वेग मंदावल्याने आयात-निर्यात करणाऱ्या उद्योजकांसमोर अडचणी उभ्या राहिल्या आहेत. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे उत्पादन खर्च वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाहतूक, लॉजिस्टिक्स आणि ऊर्जेचा खर्च वाढल्यास उद्योगांवर आर्थिक दबाव वाढणार आहे. यावर उपाय म्हणून स्थानिक पुरवठादार वाढवणे आणि कच्च्या मालाचा साठा करण्यावर उद्योजकांनी भर दिला आहे. उद्योग संघटनांनी या परिस्थितीवर लक्ष ठेवून मदत करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.
कामगारांच्या शिफ्टमध्ये कपात
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, चाकणमधील राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय वाहननिर्मिती कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनाचे वेळापत्रक बदलण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी कामगारांच्या शिफ्टमध्ये कपात करण्यात आली असून, कंपन्यांनी पर्यायी पुरवठादार शोधण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
सध्या उत्पादन थांबले नसले तरी...
वाहन निर्मिती कंपन्यांना मोठ्या प्रमाणात गॅसची आवश्यकता असते. गॅसची आवक मंदावल्यास उत्पादनावर मोठा परिणाम होईल. सध्या उत्पादन पूर्णपणे थांबले नसले तरी अनिश्चितता कायम आहे. हा तणाव दीर्घकाळ राहिल्यास उत्पादन, निर्यात आणि रोजगारावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप बटवाल, उद्योजक योगेश वाके आणि विजय बोत्रे यांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.