

चाकण, ता. १९ : चाकण औद्योगिक वसाहतीमधील अनियोजित विकास आणि पायाभूत सुविधांच्या अभावाला चाप लावण्यासाठी राज्य सरकार ''इंडस्ट्रियल टाऊनशिप'' कायदा लागू करण्याच्या तयारीत आहे. या निर्णयामुळे उद्योगांना मोठा दिलासा मिळून गुंतवणुकीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
चाकण औद्योगिक वसाहत पाच टप्प्यांमध्ये विस्तारलेली असून, सुमारे साडेसहा हजार एकरवर अधिकृत, तर चार हजार एकरवर खासगी जागेत उद्योग उभे आहेत. या प्रचंड विस्तारामुळे येथे पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण आला आहे. रस्ते, गटारे, कचरा व्यवस्थापन, दिवाबत्ती आणि सार्वजनिक वाहतूक यांसारख्या सुविधांसाठी विविध सरकारी यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसतो. यामुळे वाहतूक कोंडी, अस्वच्छता, विजेचा लपंडाव आणि प्रदूषण यांसारख्या समस्यांनी गंभीर रूप धारण केले आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे अनेक विकासकामे रखडली असून, औद्योगिक परिसराला बकाल स्वरूप आले आहे.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील महत्त्वाच्या औद्योगिक वसाहतींमध्ये इंडस्ट्रियल टाऊनशिप कायदा लागू करण्याचे सुतोवाच केल्यानंतर प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. या कायद्यांतर्गत चाकणमध्ये एक सक्षम स्थानिक प्राधिकरण (Township Authority) स्थापन करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. या प्राधिकरणाला औद्योगिक परिसरातील पायाभूत सुविधांचे नियोजन, अंमलबजावणी आणि देखभाल करण्याचे सर्वाधिकार मिळतील. यामुळे कामांसाठी वेगवेगळ्या विभागांच्या परवानगीची गरज भासणार नाही आणि निर्णय प्रक्रिया वेगवान होईल. चाकणसोबतच रांजणगाव, शेंद्रा, वाळूज आणि तळेगाव यांसारख्या औद्योगिक पट्ट्यांमध्येही ही व्यवस्था लागू करण्याची चाचपणी सुरू आहे.
उद्योगांना मिळणार नवसंजीवनी
इंडस्ट्रियल टाऊनशिपच्या स्थापनेमुळे उद्योगांना आवश्यक असलेल्या नागरी सुविधा एकाच छताखाली आणि अधिक वेगाने उपलब्ध होतील. उद्योजकांना परवानग्यांसाठी करावी लागणारी धावपळ थांबेल. नियोजनबद्ध विकासामुळे परिसराचे सौंदर्य वाढेल आणि गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण होईल. याशिवाय, स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊन परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. त्यामुळे चाकणच्या भविष्यातील औद्योगिक प्रगतीसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
साडेदहा हजार एकरचा पसारा, नियोजनाचा अभाव
चाकण औद्योगिक वसाहत ही एमआयडीसीच्या पाच टप्प्यांतील ६,५०० एकर आणि खासगी उद्योगांची ४,००० एकर अशा एकूण १०,५०० एकरांवर पसरली आहे. राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या या हबमध्ये पायाभूत सुविधांचे नियोजन मात्र पूर्णपणे विस्कळित आहे. एकाच सक्षम प्राधिकरणाच्या अभावामुळे या प्रचंड मोठ्या क्षेत्राचा विकास अनियोजित झाला असून, समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत.
चाकणच्या वाढत्या औद्योगिकीकरणामुळे येथे इंडस्ट्रियल टाऊनशिपची नितांत गरज आहे. सरकारने याबाबत त्वरित निर्णय घ्यावा. मात्र, हा निर्णय घेण्यापूर्वी येथील अंतर्गत रस्ते आणि रिंग रोडची कामे पूर्ण करावीत, जेणेकरून वाहतुकीचा ताण कमी होईल. सध्याच्या कोंडीमुळे अनेक उद्योजक स्थलांतर करण्याच्या विचारात आहेत. टाऊनशिपमुळे औद्योगिक विकासाला निश्चितच मोठी चालना मिळेल.
- योगेश वाके, उद्योजक
हे होणारे प्रमुख बदल
एकात्मिक व्यवस्थापन: रस्ते, गटारे, ड्रेनेज आणि पाणीपुरवठा यांसारख्या पायाभूत सुविधांची देखभाल आणि दुरुस्ती एकाच प्राधिकरणाद्वारे होईल.
स्वच्छता व घनकचरा : संपूर्ण औद्योगिक परिसरातील कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छता आणि सांडपाणी नियोजनाची जबाबदारी निश्चित केली जाईल.
दिवाबत्ती व वाहतूक नियंत्रण : परिसरातील पथदिव्यांची (स्ट्रीट लाइट) व्यवस्था आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विशेष अधिकार प्राधिकरणाला मिळतील.
उद्योजकांना दिलासा : स्थानिक प्रशासकीय अडथळे दूर होऊन उद्योगांसाठी आवश्यक परवानग्या आणि सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.