

चाकण, ता. ८ : लक्ष्मीपूजनामुळे चाकण बाजारपेठेत झेंडूच्या फुलांच्या किमतींनी उसळी घेतली. झेंडूचा भाव प्रतिकिलो तब्बल २०० रुपयांवर पोहोचला आहे. औद्योगिक वसाहतीतून फुले, हारांना मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती.
अहिल्यानगर व बुलढाणा जिल्ह्यांतून झेंडूची फुले चाकण बाजारात विक्रीसाठी आली आहेत. येत्या दोन दिवसांत भाव चारशे रुपये प्रतिकिलोपर्यंत जाण्याची शक्यता शेतकरी विक्रेत्यांनी वर्तवली आहे. दिवाळी म्हटले की, घरासमोर आकर्षक रांगोळी, दाराला झेंडूच्या फुलांचे तोरण, लक्ष्मीपूजनासाठी फुलांच्या माळा, देवघरातील सजावट यांना विशेष महत्त्व असते. त्यामुळे दिवाळीच्या सणात झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. यंदाही चाकण बाजारपेठेत फुलांची खरेदी करण्यासाठी नागरिकांची आणि औद्योगिक वसाहतीतील कामगार वर्गाची मोठी गर्दी आहे. मात्र मागणीच्या तुलनेत फुलांची आवक दुष्काळामुळे कमी असल्याने भावात वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दिवाळीच्या सणामुळे फुलविक्रेत्यांच्या व्यवसायात तेजी आली असली तरी वाढलेल्या किमतींमुळे काही ग्राहकांकडून मर्यादित प्रमाणात खरेदी केली जात आहे. सणासुदीच्या काळात फुलांचे भाव आणखी वाढणार का याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. दिवाळीच्या आनंदात फुलांच्या वाढलेल्या भावांनी मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका दिला आहे.
यंत्रांच्या पूजेसाठी फुलांची, हारांची खरेदी
लहान तसेच मोठे हार, तोरण, पूजेसाठी लागणाऱ्या फुलांच्या माळा यांचे भाव तीनशे, पाचशे ते एक ते दोन हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. विशेषतः घरगुती सजावट, धार्मिक कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात फुले खरेदी करणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसत आहे. कंपन्यांमध्येही कंपनीतील सजावट, यंत्रांची पूजा यासाठी मोठ्या प्रमाणात फुलांची, हारांची, तोरणांची खरेदी होत आहे.
एक हजार किलोहून अधिक झेंडूची फुले चाकण बाजारात विक्रीसाठी आणलेली आहेत. चाकण बाजारात झेंडूच्या फुलाला औद्योगिक वसाहतीमुळे व मोठ्या रहिवासी वस्तीमुळे चांगला बाजारभाव मिळतो. त्यामुळे फुले विक्रीसाठी आणलेली आहेत. दोनशे रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे. दिवाळी पाडव्यामुळे अजून भाव वाढतील. भाव चारशे रुपयांपर्यंत प्रतिकिलो जातील, अशी आशा आहे. यंदा दुष्काळामुळे फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे.
- अंकुश देशमुख, शेतकरी, मेहकर, जि. बुलढाणा
11547
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.