बाजारभावाअभावी कांदा उत्पादकांवर आर्थिक संकट
चाकण, ता. १७ : यंदा कांद्याचे उत्पादन चांगले होत आहे. त्यामुळे बाजारात नव्या कांद्याची आवक वाढू लागली आहे. मात्र, योग्य बाजारभावाअभावी शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे बाजारभाव स्थिर आहेत. त्यातून उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. निर्यातीवरील निर्बंध, कांदा साठवणूक समस्या, देशांतर्गत बाजारातील मागणी घटल्यामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
राज्यातील विविध बाजार समित्यांत बाजार आवारात नव्या कांद्याला घाऊक बाजारात प्रतिकिलोला किमान आठ ते १२ ते कमाल १८ रुपयांपर्यंतच बाजारभाव मिळत आहे. हा बाजारभाव अनेक महिने स्थिर आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत हा बाजारभाव अपुरा आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
कांद्याच्या बाजारभावावर सर्वाधिक परिणाम निर्यातीवरील निर्बंधांचा झाला आहे. देशांतर्गत बाजारातील बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून वेळोवेळी कांदा निर्यातीवर बंदी किंवा किमान निर्यात मूल्य निश्चित करण्यात येते. त्या परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होत आहे.
शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
कांदा साठवणुकीची समस्या देखील गंभीर बनली आहे. अनेक शेतकऱ्यांकडे शास्त्रीय पद्धतीने साठवण करण्याची सुविधा नाही. तो खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. साठवणूक केली तर खर्च वाढतो आणि लगेच विक्री केली तर कमी बाजारभावात विकावा लागतो. अशा दुहेरी संकटात शेतकरी अडकले आहेत.
शेतकरी पुन्हा कर्जाच्या विळख्यात
कांद्याच्या कमी बाजारभावाचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर होत आहे. खत, बियाणे, रोपे, मजुरी, कांदा लागवड, वाहतूक अशा खर्चासाठी घेतलेले कर्ज फेडणे शेतकऱ्यांना कठीण जात आहे. अनेक शेतकरी पुन्हा कर्जाच्या विळख्यात जात आहेत. शेतकरी संघटनांकडून सरकारकडे निर्यातीवरील निर्बंध शिथिल करावेत, किमान आधारभूत किंमत जाहीर करावी, कांदा साठवणूक व प्रक्रिया उद्योगांना चालना द्यावी, अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे.
बांगलादेशाने मर्यादित स्वरूपात कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. त्यामुळे काही प्रमाणात निर्यात सुरू झाली आहे. देशातील ही निर्यात वाढण्याची गरज आहे. त्यामुळे कांद्याचे बाजारभाव पुढील काळात वाढतील, असे निर्यातदार कंपन्या, व्यापारी प्रशांत गोरे पाटील, माणिक गोरे, जमीरभाई काझी, यांचे म्हणणे आहे.
कांदा निर्यात धोरणाचा परिणाम
१. बदलांमुळे कांदा निर्यात गुंतागुंतीची
२. शुल्क हटवूनही कांदा निर्यातीला चालना बदलत्या धोरणामुळे मिळेना
३. बदलांमुळे भारताच्या पारंपरिक निर्यात बाजारपेठांमध्येही बदल
४. बांगलादेश, सौदी अरेबिया, दुबई, श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया या देशांनी इतर पुरवठादारांना प्राधान्य

