

चाकण, ता. १२: येथील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला बाह्यवळण मार्ग मेदनकरवाडीतील काही शेतकऱ्यांच्या विरोधामुळे अनेक वर्षांपासून रखडला आहे. मात्र, आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सक्तीने भूसंपादन करून येत्या वर्षभरात हा मार्ग पूर्ण करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
चाकण औद्योगिक वसाहतीमुळे पुणे-नाशिक महामार्ग आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावर होणारी प्रचंड वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पीएमआरडीएने अनेक अंतर्गत मार्ग प्रस्तावित केले आहेत. त्यापैकी कडाचीवाडी ते मेदनकरवाडी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या मार्गासाठी कडाचीवाडी हद्दीतील मोजणी पूर्ण झाली आहे, मात्र मेदनकरवाडीतील काही शेतकऱ्यांनी हरकत घेतल्याने तेथील प्रक्रिया थांबली होती.
हा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी स्थानिक पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि पंचायत समिती सदस्य महेंद्र मेदनकर, सुनील कड, मनोज खांडेभराड, विशाल पऱ्हाड यांनी नुकतीच पीएमआरडीएचे आयुक्त अभिजित चौधरी यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी बाधित शेतकऱ्यांच्या समस्या मांडून मार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली. याशिवाय, सुनील कड आणि मनोज खांडेभराड यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही मंत्रालयात भेटून निवेदन दिले असून, शासनाने यात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
हा मार्ग सार्वजनिक हिताचा असल्याने भूसंपादन प्रक्रिया सक्तीने राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित प्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच मोजणी पूर्ण केली जाईल.
- शिवकुमार कुपन, कार्यकारी अभियंता, पीएमआरडीए
मार्गाचे स्वरूप
कडाचीवाडी (रासे फाटा) ते मेदनकरवाडी (बंगलावस्ती) असा हा बाह्यवळण मार्ग सुमारे अडीच किलोमीटर लांबीचा व ३६ मीटर रुंदीचा असेल. या मार्गावर काही ठिकाणी छोटे पूल उभारले जाणार असून, काही भाग उंचीवर असेल. मेदनकरवाडी परिसरात हा मार्ग ओढ्याला लागून जाणार असल्याने भूसंपादनासह तांत्रिक कामांचेही आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.