

पिंपरी, ता. १९ : चाकण औद्योगिक क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर (पीएमआरडीए) सोपवण्यात आली आहे. केवळ एमआयडीसी नव्हे तर, परिसरातील नागरी भागाचा विचार करता, स्थानिक नगर परिषदेच्या सहकार्याने स्वतंत्र घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘एमआयडीसी’ प्रशासन भूखंड देणार आहे.
चाकणच्या औद्योगिक व नागरी प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून, ‘एमआयडीसी’, ‘पीडब्ल्यूडी’, ‘पीएमआरडीए’, महावितरण, वाहतूक पोलिस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, स्थानिक स्वराज्य संस्थादेखील कार्यरत असतील. यापैकी प्रत्येक विभागाला जबाबदारी निश्चित केली आहे. त्यानुसार ‘पीएमआरडीए’ औद्योगिक कंपन्यांतर्गत ‘कनेक्टिव्हिटी’सह मिसिंग लिंकचीही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था व ‘एमआयडीसी’ या दोन्ही विभागांकडून जागेसह इतर सहकार्य मिळेल. केवळ औद्योगिक क्षेत्रातील कचऱ्याच्या प्रश्नांवर नव्हे, तर संपूर्ण चाकणच्या कचरा प्रश्नांवर तोडगा काढण्यात येणार आहे, असे प्रशासनाने सांगितले.
जागेची पाहणी सुरू
चाकण परिसरात जागेच्या उपलब्धतेअभावी कचरा प्रक्रिया प्रकल्प होत नाही. त्यावर परिसरासाठी एकत्रित प्रकल्प राबविण्यासंदर्भात निश्चित झाले आहे. त्यानुसार ‘एमआयडीसी’कडून आवश्यक त्या जागा (ओपन स्पेस) दाखविण्यात येणार आहेत. सोयीस्कर व अपेक्षित जागांसंदर्भात कार्यवाही केली जाणार आहे. दोन ते दहा हेक्टरपर्यंत उपलब्ध भूखंडांची केली जाणार आहे. ही जागा संपूर्ण वर्ग करायची, की तुकडा पाडून द्यावी यावर ‘एमआयडीसी’चा भूमी विभाग निर्णय घेणार आहे.
कचऱ्याची परिस्थिती
चाकण औद्योगिक परिसरात ग्रामपंचायतींतर्गत नागरी वस्ती वाढत आहे. तेथे औद्योगिक कचऱ्यासह घातक आणि टाकाऊ असा सरासरी १५ टन कचरा दररोज जमा होतो. तर, इतर नागरी वस्तीमध्ये हे प्रमाण दररोज १० टनांच्या आसपास आहे.
चाकणच्या विविध प्रश्नांवर कामे सुरू झाली आहेत. त्यापैकी कचरा प्रक्रियेसाठी सर्वसमावेशक प्रकल्प उभारणीबाबत भूमी विभागाकडून पाठपुरावा केला जात आहे. या संदर्भात संयुक्त बैठक घेतली जाईल. त्यानंतर अधिक कार्यवाही होईल.
नीलेश मोढवे, अधीक्षक अभियंता, ‘एमआयडीसी’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.