चाकणच्या जनावरांच्या बाजाराबाबत झाला मोठा निर्णय

राजेंद्र सांडभोर
Wednesday, 16 September 2020

खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण उपबाजार आवारामध्ये, भरणारा जनावरांचा बाजार आणि कांदा बटाटा बाजार, शनिवार ऐवजी रविवारी भरवण्यात येणार आहे. 

राजगुरुनगर : खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण उपबाजार आवारामध्ये, भरणारा जनावरांचा बाजार आणि कांदा बटाटा बाजार, शनिवार ऐवजी रविवारी भरवण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर यांनी दिली.

खेड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने १८ व १९ रोजी जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. तसेच चाकण, राजगुरूनगर आणि आळंदी याठिकाणी घरोघरी जाऊन कोरोनासदृश लक्षणे असणाऱ्या लोकांची प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे.

या तपासणीसाठी लोकांनी घरी थांबावे म्हणून, शुक्रवारी व शनिवारी  राजगुरुनगर, चाकण आणि शेलपिंपळगाव या तीनही ठिकाणचे बाजार समितीचे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत.

आठवडा बाजारात खंड पडू नये म्हणून जनावरांचा बाजार, कांदा-बटाटा बाजार, तरकारी बाजार इत्यादी शनिवार ऐवजी रविवारी (२० सप्टेंबर ) भरवले जाणार आहेत, असे बाजार समितीचे प्रभारी सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी कळविले आहे.

बाजार समितीने केलेल्या बदलाची दखल शेतकरी, व्यापारी, आडते व तरकारी विक्रेत्यांनी घ्यावी, असे आवाहन बाजार समितीकडून करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chakan's cattle market will be filled on Sunday