पवनचक्‍क्‍यांमुळे वाढले सरडे 

पवनचक्‍क्‍यांमुळे वाढले सरडे 

पुणे - पश्‍चिम घाटातील पवनचक्‍क्‍यांमुळे पावसावर परिणाम होत असल्याचे गृहितक फेटाळण्यात आले असले, तरी याच पवनचक्‍क्‍यांमुळे शिकारी पक्षी तीन ते चार पटींनी कमी झाले असून, सरड्यांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. तीन वर्षांच्या संशोधनातून हे सिद्ध झाले असून, याची दखल "नेचर' या जगप्रसिद्ध मासिकाने घेतली आहे. 

बंगळूरच्या डॉ. मारिया ठाकर, साताऱ्याचे हर्षल भोसले आणि पुण्याचे अमोद झांबरे यांनी याबाबत 2014 ते 16 या काळात हे संशोधन केले आहे. पश्‍चिम घाटातील चाळकेवाडी पठाराच्या परिसरात पवनचक्‍क्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याचा पक्ष्यांवर आणि प्राण्यांवर विशेष करून अन्नसाखळीवर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी या त्रयींनी हा परिसर आणि कोयना अभयारण्याजवळील पठाराचा अभ्यास केला. अभयारण्याच्या शेजारील पठाराचा भाग दरीत असल्याने तेथे पवनचक्‍क्‍या नाहीत. त्यामुळे हे दोन्ही भाग निवडण्यात आले. त्यातून काही धक्कादायक निष्कर्ष हाती लागले. पवनचक्‍क्‍यांमुळे घार, गरुड, बहिरी ससाणा, असे शिकारी प्राणी तीन ते चार पटींनी कमी झाल्याचे दिसले. हे पक्षी अन्नसाखळीतील सरडे, साप, अशा सरपटणाऱ्या प्राण्यांची शिकार करतात. शिकारी पक्ष्यांचीच संख्या घटल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांमधील सरड्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यातही सुपर्बा या रंग बदलणाऱ्या सरड्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. 

या अभ्यासानुसार सरड्यांमधील गळ्याला रंगीत पोळीसारखा भाग असणाऱ्या पोटजातींची संख्या अधिक आहे. या विशिष्ट उपप्रजातीची संख्या वाढल्याने त्यांच्यात खाद्यासाठीची स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे कीटकांची संख्या रोडावली आहे. तसेच, या सरड्यांमध्ये आपापसांत एकमेकांवर हल्ले करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. ते अधिक आक्रमक झाले आहेत. सरड्यांमध्ये सहसा हल्ला करण्यापूर्वी रंग बदलण्याची प्रवृत्ती आहे. त्यांच्या गळ्यावरील पोळीचा रंग बदलून समोरच्याला आपली ताकद दाखविली जाते. मात्र, या भागातील या सरड्यांमध्ये ही रंग बदलण्याची प्रवृत्ती कमी होत असून, ते थेट हल्ले करीत आहेत. तसेच, त्यांचा रंगही फिका होत आहे. तर, घारी आणि गरुडांमध्ये स्ट्रेस हार्मोनचे प्रमाण (कॉर्टिकोस्टेरॉन) कमी झाले आहे. शिकारी पक्ष्यांची संख्या कमी होण्यास हे कारणीभूत आहे. 

पवनचक्‍क्‍या असलेल्या भागात दर तीन तासांमध्ये पाच शिकारी पक्षी आढळले. तर, ज्या भागात पवनचक्‍क्‍या नाहीत, अशा ठिकाणी हेच प्रमाण 18 ते 19 आढळले. पवनचक्‍क्‍यांच्या भागात शिकारी पक्ष्यांची सरपटणाऱ्या प्राण्यांवरील हल्ल्यांची संख्या रोडावली असून, हे प्रमाण प्रतितीन तासांत जवळपास नव्हतेच, तर पवनचक्‍क्‍या नसलेल्या भागात हीच संख्या एक ते दोन पक्षी इतकी होती. दुसरीकडे पवनचक्‍क्‍या असलेल्या भागात सरड्यांची संख्या प्रति 100 मीटरमध्ये सात, तर पवनचक्‍क्‍या नसलेल्या भागात हीच संख्या केवळ तीन आढळली. 

या भागात पवनचक्‍क्‍यांची संख्या प्रमाणापेक्षा अधिक आहे. दोन पवनचक्‍क्‍यांमधील अंतर जास्तीजास्त 100 मीटर इतकेच आहे. या घनतेमुळेच शिकारी पक्ष्यांची संख्या घटली आहे. हे अंतर किमान 500 मीटर ते एक किलोमीटर असावे. 
- हर्षल भोसले, अभ्यासक 

हे केवळ दुसरे उदाहरण 
हे संशोधन मुख्यत्वे सरड्यांवर केले. शिकारी प्राणी याच सरड्यांवर अधिक अवलंबून असल्याने त्यांच्यावरील संशोधन महत्त्वाचे आहे. मात्र, पवनचक्‍क्‍या असलेल्या भागात सरड्यांची संख्या वाढणे हा अन्नसाखळीला धोका आहे. अशा पद्धतीने एखाद्या प्रजातीची मोठ्या प्रमाणात संख्या वाढल्याचे हे केवळ दुसरे उदाहरण असून, यापूर्वी उत्तर पश्‍चिम अटलांटिक समुद्रात 1980 आणि 1990 मध्ये मासेमारीमुळे ऍटलांटिक कॉड या मोठ्या माशांची संख्या कमी झाली होती. परिणामी, त्यांचे खाद्य असलेले लहान मासे (फोरेज फिश), खेकडे (नॉर्दर्न स्नो क्रॅब) मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे हर्षल भोसले यांनी सांगितले. भोसले यांचे हे संशोधन "नेचर'च्या 5 नोव्हेंबरच्या अंकात प्रसिद्ध झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com