भोसे : परदेशातून पांगले मातृभूमीचे ऋण; उद्योजक चंदन चव्हाण यांच्याकडून महाबळेश्वर तालुक्यातील ५० गावांना ''सौर'' प्रकाशाची भेट
महाबळेश्वरातील ५० गावांना सौर पथदिवे
उद्योजक चंदन चव्हाण यांच्याकडून भेट; परदेशात राहूनही मातृभूमीशी नाळ कायम
भोसे, ता. १५ : जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर सातासमुद्रापार यशाचे शिखर गाठल्यानंतरही आपल्या मातीशी असलेली नाळ कशी जपली जाते, याचे उत्तम उदाहरण दाभे मोहन (ता. महाबळेश्वर) गावचे सुपुत्र चंदन चव्हाण यांनी घालून दिले आहे. इटलीस्थित यशस्वी उद्योजक असताना सामाजिक बांधिलकीतून तालुक्यातील तब्बल ५० गावांना सौर पथदिवे त्यांनी भेट दिले आहेत.
ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी वाड्या-वस्त्यांवर असलेला अंधार दूर व्हावा आणि ग्रामस्थांना सुरक्षितता मिळावी, या उद्देशाने श्री. चव्हाण यांनी विनामूल्य सौर पथदिवे वाटपाचा संकल्प सोडला आहे. त्यांनी आतापर्यंत सुमारे ४० ते ५० गावांमध्ये ४५० हून अधिक आधुनिक सौर पथदिव्यांचे यशस्वी वितरण केले आहे.
यंदाच्या २०२६ या वर्षातही या उपक्रमाचा पुढील टप्पा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने राबविला जात आहे. यामध्ये दाभे दाभेकर, घोणसपूर, गोरोशी, येरणे खुर्द, दरे (जावळी), दुधोशी, खेतेश्वर देवालय पारूट आणि महारोळे या गावांचा समावेश करण्यात आला आहे. परदेशातील व्यस्त कार्यपद्धतीतही आपल्या गावातील दुर्गम भागातील रस्ते उजळावेत, ही त्यांची भावना ग्रामीण विकासासाठी एक आदर्श वस्तुपाठ ठरली आहे.
या उपक्रमांतर्गत सौर पथदिव्यांचे वितरण एक ते १५ एप्रिल या कालावधीत दाभे मोहन येथून केले जाणार आहे. संबंधित गावांच्या ग्रामपंचायत प्रतिनिधींनी किंवा कार्यकर्त्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या गावातील सार्वजनिक ठिकाणी प्रकाशाची सोय करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. समन्वयासाठी दाभे मोहन येथील शैलेश शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचे सूचित करण्यात आले आहे.
---------------------------
चौकट :
कर्तृत्व परदेशात, मन मात्र मायभूमीत
जावळीच्या डोंगरदऱ्यात जन्मलेला एक तरुण आज इटलीसारख्या देशात यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळवतो, ही अभिमानास्पद बाब आहे. मात्र, यशाच्या शिखरावर असतानाही आपल्या गावाची ओढ आणि तिथल्या अंधारमय वाड्या-वस्त्यांची चिंता चंदन चव्हाण यांना स्वस्थ बसू देत नाही. केवळ आर्थिक मदत न करता सौरऊर्जेसारखा शाश्वत मार्ग निवडून त्यांनी ग्रामीण विकासाला एक नवी दिशा दिली आहे. ''मातृभूमीचे देणे'' या भावनेतून सुरू झालेला हा यज्ञ केवळ पथदिव्यांचा नसून तो ग्रामीण भागातील सुरक्षिततेचा आणि विश्वासाचा प्रकाश आहे.
---------------------------
कोट
आमच्या जावळीचा सुपुत्र इटलीमध्ये राहूनही आपल्या गावातील अंधाराची दखल घेतो, हे पाहून ऊर भरून येतो. अनेकदा सरकारी योजना पोहोचायला वेळ लागतो; पण चंदनदादांनी स्वतःहून पुढाकार घेऊन ४५० हून अधिक सौर दिवे दिले आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी महिला, लहान मुले आणि वृद्ध नागरिकांना रस्त्यावरून चालणे सुरक्षित झाले आहे. पर्यावरणपूरक ऊर्जेचा हा वापर इतर उद्योजकांसाठीही प्रेरणादायी ठरेल. अशा दानशूर आणि कर्तव्यदक्ष सुपुत्राचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
- शैलेश शिंदे, ग्रामस्थ, दाभे.
-----------------------------
07436
चंदन चव्हाण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

