पाणीपुरीवाली आजी सोशल मीडियावर व्हायरल (व्हिडिओ)

पाणीपुरीवाली आजी सोशल मीडियावर व्हायरल (व्हिडिओ)

पिंपरी - पतीचा अपघात झाला. उपचारासाठी होतं नव्हतं ते सगळं घालवलं. मात्र, मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्यानंतर पदरी उरला तो केवळ कर्जाचा डोंगर. तरीही नियतीपुढे हार न मानता ७५ वर्षांच्या आजीने उभारी घेत उपचारावेळी झालेले कर्ज फेडण्यासाठी पाणीपुरीचा व्यवसाय पुन्हा सुरू केला. पंधरा दिवसांतच आजी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आणि आजीबाईंना मोठा दिलासा मिळाला. त्यांच्या मदतीसाठी अनेकजण पाणीपुरी खाण्यासाठी आकुर्डीत येत आहेत. 

या पाणीपुरीवाल्या आजींचे नाव आहे चंद्रभागा शिंदे. मूळ नगर जिल्ह्यातील कुटुंब. सध्या आकुर्डी येथे वास्तव्यास आहेत. पती माधव शिंदे हयात असताना वाल्हेकरवाडीत ४० वर्षांपासून संसाराचा गाडा रेटण्यासाठी पाणीपुरीचा व्यवसाय मोठ्या जोमाने या दांपत्याने थाटला होता. पण, आकुर्डीत सायकलवरून जात असताना माधव यांना गाडीने धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. उपचार करूनही ते बचावले नाहीत.

आजीने पाणीपुरीचा व्यवसाय मोठ्या जोमाने पुन्हा सुरू केला. त्यांची पाणीपुरीची हातगाडी सध्या आकुर्डीतील म्हाळसाकांत चौकात गेल्या पंधरा दिवसांपासून उभी आहे. आजीच्या हाताची पाणीपुरीची चवही न्यारीच आहे. घरी पाटावर वाटलेल्या वाटाण्यांमुळे पाणीपुरीही स्वादिष्ट बनत आहे. पाणीपुरी केवळ १५ रुपयांना, तर भेळ २५ रुपयांना आहे. व्यवसायाची चिकाटी आणि गोडी पाहून त्यांनी सर्वांच्या मनात घर केले आहे. आजींविषयी वाकड येथील अभियंता शुभम गराडे म्हणाले, ‘‘आजींची पोस्ट फेसबुकवर पाहिली. चैन पडली नाही. त्यांना मदत करण्यासाठी येथे आलो. पुढेही येथेच यायचे ठरविले आहे.’’ 

सोशल मीडियावर धुमाकूळ
चंद्रभागा शिंदे यांनी ‘पाणीपुरीवाली आजी’ म्हणून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ‘आजीला मदत करा’ अशा आशयाच्या सहानुभूतिपूर्वक पोस्टही तरुणांनी व्हायरल केल्याने पाणीपुरी खाण्यासाठी चौकात गर्दी उसळत आहे. व्हायरल पोस्ट पाहून हिंजवडी व पुण्यातूनही खवय्ये पाणीपुरी खाण्यासाठी आकुर्डीत येत आहेत. फेसबुक, व्हॉटस्‌ॲप, इन्स्टाग्रामवर तरुणांनी त्यांचे फोटो शेअर केल्याने पाणीपुरी खाण्यासाठी चारचाकीच्या रांगा लागत आहेत. तरुणाईच्या डीपी व स्टेटस्‌लाही सध्या आजी झळकत आहेत.

पतीच्या निधनानंतर मुलावर कर्जाचा डोंगर झाला आहे. घरात बसून आयुष्य झिजविण्यापेक्षा मुलाला हातभार लावत आहे. माझी तेवढीच मदत होईल. तरुणांनी पाणीपुरीची चव आणि परिस्थितीही पाहून मदत केली. त्यामुळे गर्दी वाढली आहे. एकाच दिवसात पाणीपुरीचा माल संपला. सर्वांचे प्रेम पाहून मी थक्क झाले. 
- चंद्रभागा शिंदे, पाणीपुरीवाली आजी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com