पिंपरी : चांद्रयान मोहिमेची भुरळ गणेश मंडळानाही

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 September 2019

- निगडी-प्राधिकरणातील नवनगर गणपती मित्रमंडळाने 'चांद्रयान 2'ची प्रतिकृती तयार केली आहे
- चांद्रयानाची हुबेहूब प्रतिकृती साकारतानाच विक्रम लँडरचाही त्यात समावेश असल्याने विज्ञानप्रेमी गणेशभक्तांसाठी ती पर्वणी ठरली आहे.

पिंपरी : यंदा अनेक गणेश मंडळांना भारताच्या चांद्रयान मोहिमेची भुरळ पडली असल्याचे पाहायला मिळत आहे. चांद्रयानाची हुबेहूब प्रतिकृती साकारतानाच विक्रम लँडरचाही त्यात समावेश असल्याने विज्ञानप्रेमी गणेशभक्तांसाठी ती पर्वणी ठरली आहे.
निगडी-प्राधिकरणातील नवनगर गणपती मित्रमंडळाने 'चांद्रयान 2'ची प्रतिकृती तयार केली आहे. या यानाच्या लॉंचिगचे प्रात्यक्षिक त्यात पाहायला मिळत आहे. भारताच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे वैशिष्ट्यपूर्ण देखावे साकारणे, हे या मंडळाचे गेल्या 36 वर्षांतील वैशिष्ट्य राहिले आहे. भारताचे मानबिंदू ठरणाऱ्या प्रकल्पांची प्रतिकृती साकारून ते गणेशभक्तांना त्याची विस्तृत माहिती देतात.

पाहा चांद्रयानाचा संपूर्ण प्रवास
मंडळाने जीएसएलव्ही या रॉकेटच्या उड्डाणापासून, चंद्रावर विक्रम या लॅंडरच्या अलगद उतरण्यापर्यंत आणि त्यातून प्रज्ञान या रोव्हरच्या चंद्रावरील फिरण्यापर्यंत', काऊंटडाऊनच प्रवास त्यात दाखविला आहे. या देखाव्यात इलेक्‍ट्रिक व इलेक्‍ट्रॉनिक इंजिनिअरिंगचा पुरेपूर वापर केला आहे. व्हिडिओच्या माध्यमातून या मोहिमेची माहिती देण्यात येते. विशेष म्हणजे यात इलेक्‍ट्रिक मोटर्स, एलईडी लाइटस आणि यांना कंट्रोल करण्यासाठी मायक्रो कंट्रोलर (संगणक) वापरले आहेत. इंजिनिअरिंग, मॉडेल मेकिंग आणि नियोजनाची बाजू लौकिक काकडे यांनी, तर शुभम कर्पे, हर्शल लाहोटी, सुब्रह्मण्यम कोटीयन, अखिल वारियर, श्रद्धा कर्पे, रवी घोरपडे, वैष्णवी कदम या कार्यकर्त्यांनी सजावटीसाठी भरपूर मेहनत घेतली आहे.

देखावा साकारणारे रोहित शेटे म्हणाले की, चांद्रयान मोहीम सुरू झाल्यापासून माझ्या डोक्‍यात ही संकल्पना आकार घेऊ लागली. मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कदम, आकाश पाटील, श्रीकांत रंधावे, विक्रम गिते, विवेक कुमार, मानस तिलांबी, जितेंद्र जोशी या टीमने 15 दिवसांत हा देखावा तयार केला. अधिकाधिक पर्यावरणपूरक गोष्टी यासाठी वापरल्या.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrayaan 2's Replica at nigdi in ganesha Festival 2019