

चाकण, ता. १२ : पिंपरी-चिंचवडमधून हद्दपार झालेला कुदळवाडीचा भंगार व्यवसाय आता खेड तालुक्यासाठी मोठी डोकेदुखी ठरला आहे. या व्यवसायाने आणलेल्या अनियंत्रित वाहतूक कोंडीने आणि वाढत्या अवैध धंद्यांनी नागरिकांचे जगणे मुश्किल केले आहे. या गंभीर समस्येवर प्रशासनाने धारण केलेले मौन संशयास्पद असून, नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कुदळवाडीतील कारवाईनंतर विस्थापित झालेल्या भंगार व्यावसायिकांनी आपला मोर्चा खेड तालुक्याकडे वळवला आहे. चाकण औद्योगिक वसाहतीलगतच्या गावांमध्ये जागा विकत घेऊन किंवा पत्र्याची शेड, गोदामे भाड्याने घेऊन मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय फोफावला आहे. अनेक गोदामांमध्ये ज्वलनशील पदार्थांचा साठा कोणत्याही सुरक्षेविना केला जात असल्याने मोठ्या अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. याशिवाय, कंपन्यांमधील चोरीचा माल विकत घेणारी संघटित टोळीच यामागे सक्रिय असल्याची भीती व्यक्त होत आहे.
अवजड वाहनांची रस्त्यालगतची बेकायदा पार्किंग, मालाची चढ-उतार यामुळे आधीच वर्दळीच्या असलेल्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. याचा सर्वाधिक फटका स्थानिक नागरिक आणि कामगार वर्गाला बसत आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने अनधिकृत व्यवसाय उभे राहत असताना संबंधित विभाग आर्थिक लागेबांध्यांमुळे डोळेझाक करत आहेत का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. प्रशासनाच्या या अक्षम्य काणाडोळ्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, पीएमआरडीए तसेच स्थानिक प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कुदळवाडीतील भंगार व्यवसाय चाकण औद्योगिक वसाहतीतील गावांमध्ये स्थिरावल्याने अवजड वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. मुख्य मार्गांसह अंतर्गत रस्त्यांवरही वाहनांची मोठी ये-जा सुरू असल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.
या गावांमध्ये बस्तान
चिंबळी, कुरुळी, निघोजे, मोई, नाणेकरवाडी, आळंदी फाटा, मेदनकरवाडी, खराबवाडी, महाळुंगे, आंबेठाण, वराळे, वाकी बुद्रुक, वाकी खुर्द, रासे, भोसे, खालुंब्रे, रोहकल, बिरदवडी, भांबोली, वासुली, शिंदे आणि सावरदरी या गावांमध्ये भंगार गोदामांमुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.
बेकायदा गोदामांची पाहणी सुरू
चाकण औद्योगिक वसाहतीतील विविध गावांमधील बेकायदा गोदामांची पाहणी आमच्या पथकामार्फत सुरू आहे. मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोदामे असल्याचे निदर्शनास आले असून, लवकरच त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पीएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
महत्त्वाचे मुद्दे:
भंगार व्यवसायाच्या आडून कंपन्यांमधील चोरीच्या मालाची खरेदी-विक्री आणि गुन्हेगारीला ऊत.
व्यवसायासाठी आवश्यक परवाने, अग्निसुरक्षा आणि पर्यावरणविषयक नियमांची सर्रास पायमल्ली.
महसूल विभाग, पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने संयुक्त कारवाई करण्याची नागरिकांची तीव्र मागणी.
नियमांचे पालन करूनच व्यवसाय व्हावेत, अशी स्थानिकांची अपेक्षा; प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.