शेती महामंडळाच्या १२६२ एकर जमिनीवर राबविणार चारा उत्पादन कार्यक्रम

शेती महामंडळाच्या १२६२ एकर  जमिनीवर राबविणार चारा उत्पादन कार्यक्रम
Published on: 

शेती महामंडळाच्या १२६२ एकरांत चारा उत्पादन कार्यक्रम

इच्छापत्रे मागविली : चारा उत्पादनासाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामात चारा उत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या गंगापूर तालुक्यातील एकूण १२६२ एकर जमिनीवर चारा लागवडीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या उपक्रमासाठी इच्छुक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी सहकारी संस्था आणि पात्र लाभार्थ्यांकडून ३० ऑक्टोबरपर्यंत इच्छापत्रे मागविण्यात आली आहेत.जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

या अंतर्गत अंदाजे तीन ते चार महिन्यांच्या कालावधीसाठी चारा पिकांची लागवड करण्यात येईल. गंगापूर तालुक्यातील जामगाव येथे ९०० एकर, आंतापूर येथे ३०० एकर आणि वरखेड येथे ६२ एकर जमीन चारा लागवडीसाठी उपलब्ध आहे. अशा प्रकारे एकूण १ हजार २६२ एकर क्षेत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

.....चौकट....
या घटकांना करता येणार अर्ज
चारा उत्पादन व प्रक्रियेचा अनुभव असलेले शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुखाद्य व वैरण उद्योजकता विकास कार्यक्रमाद्वारे मुरघास निर्मिती प्रकल्प राबविणारे लाभार्थी तसेच शेतकरी सहकारी संस्था इच्छापत्र सादर करू शकतात. इच्छुक संस्थांनी किमान १०० एकर क्षेत्रावर वैरण लागवड करण्याची तयारी दर्शविणे आवश्यक आहे.

.....चौकट....
असा करा अर्ज
इच्छुक संस्थांनी २१ ते ३० कालावधीत कार्यालयीन वेळेत जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयात इच्छापत्र व आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. यामध्ये संस्थेच्या लेटरहेडवरील इच्छापत्र, मागणी केलेल्या क्षेत्राचा तपशील, मुख्य प्रवर्तकाचे स्वसाक्षांकित आधारकार्ड व पॅनकार्ड, वैरण उत्पादनाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र, संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र तसेच राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत कार्यरत संस्थांसाठी मान्यतेचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. याशिवाय सर्व अटी व शर्ती मान्य असल्याचे मुख्य प्रवर्तकाच्या स्वाक्षरी व शिक्क्यासह प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

निवड व भाडेकराराच्या अटी
पात्र संस्थांची निवड आणि भाडेतत्त्वावर द्यावयाच्या क्षेत्राचे निर्धारण जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत करण्यात येईल. निवड झालेल्या संस्थांकडून ५०० रुपयांच्या मुद्रांकपत्रावर करारनामा करून घेण्यात येईल. तसेच ५० हजार रुपये अनामत रक्कम धनाकर्षाद्वारे जमा करावी लागेल.शेती महामंडळाच्या जमिनीचे सर्वसाधारण भाडे प्रतिएकर ७ हजार रुपये असून, ते आगाऊ भरावे लागेल. उत्पादित चारा आवश्यकतेनुसार सर्वप्रथम शासनास उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील. शासनास आवश्यकता नसल्यास जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारा विक्री करता येईल; मात्र जिल्ह्याबाहेर चारा विक्री करता येणार नाही. जमिनीचा वापर केवळ चारा उत्पादनासाठी करणे आवश्यक राहील. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पात्र व इच्छुक संस्थांनी विहित मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह इच्छापत्रे सादर करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com