पुणे - माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणात गुन्हे शाखेने अटक केलेल्या २१ आरोपींविरुद्ध शुक्रवारी (ता. १४) न्यायालयात एक हजार ७०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. या सर्व आरोपींवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण मकोका कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजीवनी कोमकर यांच्या नाना पेठेतील जनरल स्टोअर्स दुकानावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली होती. वनराज आंदेकर याच्या सांगण्यावरून ही कारवाई केल्याचा संशय होता. संजीवनी कोमकर, जयंत कोमकर, गणेश कोमकर आणि प्रकाश कोमकर कुटुंबीयांचा मालमत्तेवरून वनराज आंदेकर कुटुंबीयांशी वाद सुरू होता.
तसेच, २०२३ मध्ये आंदेकर टोळीतील कृष्णा आंदेकरसह इतरांनी टोळी प्रमुख सोमनाथ सयाजी गायकवाड याच्या टोळीतील सदस्य निखिल आखाडेचा खून केला होता. या कारणांवरून आरोपींनी वनराज आंदेकर याच्या खुनाचा कट रचला.
सोमनाथ गायकवाडच्या टोळीतील आकाश म्हस्के, विवेक कदम, तुषार कदम आणि समीर काळे यांनी एक सप्टेंबर रोजी रात्री वनराज आंदेकर याच्यावर गोळीबार करून खून केला. या गुन्ह्यात वापरलेले आठ पिस्तूल, १३ जिवंत काडतुसे, सात कोयते, सात दुचाकी आणि तीन मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. या गुन्ह्यात २१ आरोपींना अटक केली असून, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणात २१ आरोपींवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या दोषारोपपत्रात नाना पेठेतील घटनास्थळ, आंबेगाव पठार, दापोली येथील सीसीटीव्ही चित्रीकरण, आरोपींचे मोबाईलवर झालेल्या संवादाचे तांत्रिक विश्लेषण, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब आदींचा समावेश आहे. आरोपींची मालमत्ता जप्तीची कार्यवाही करण्यात येणार आहे.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद, पोलिस उपनिरीक्षक राहुल पवार, हवालदार विनोद शिंदे, अण्णा माने यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.