
"चार्ल्स, डोन्ट फरगेट आय एम मधुकर झेंडे"
पुणे : महिलांचे निघृण खून, लुटमार करणारा 'बिकनी किलर' आणि पोलिसांना चकवणारा कुख्यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चार्ल्स शोभराज याची नेपाळच्या तुरुंगातून मुक्तता, हे दुर्दैव आहे. अशा क्रूरकर्म्याला बाहेर सोडणे हे समाज विघातक असून, त्याला फाशीची शिक्षा व्हायला हवी होती, अशी भावना निवृत्त पोलिस अधिकारी मधुकर झेंडे यांनी व्यक्त केली...
पुणेकर असलेल्या झेंडे यांनी शोभराजला मुंबई आणि गोव्यात दोनदा जेरबंद केलेेय. शोभराजची मुक्तता होत असल्याने 'सकाळ'ने झेंडे यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शोभराजच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू उलगडले. चाळीसहून अधिक महिलांचा खून करणारा क्रूरकर्मा तुरुंगातून मुक्त होतोय, हे दुर्दैव आहे, अशी खंत व्यक्त करताना, त्यांनी शोभराजच्या पहिल्या अटकेची रंजक कहाणी सांगितली.
ती अशी, "सत्तरच्या दशकात शोभराज त्यावेळी जबरी चोऱ्या करीत असे. त्याने दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये त्याने मोठी चोरी केली होती. तो मुंबईत एअर इंडियांच्या कार्यालयावर दरोडा टाकून मोठी रक्कम पळवणार असल्याची माहिती त्यावेळी मिळाली होती. त्यासाठी एक गुन्हेगार कामी आला. त्याला चांगल्या वागणुकीच्या बोलीवर मी सोडला होता. त्याने शोभराज ताज हॉटेलमधे उतरल्याची खबर दिली.
1971 ची ही घटना. खबऱ्याला बरोबर घेऊन आम्ही दोन तीन दिवस हॉटेलवर पाळत ठेवली...11 नोव्हेंबरच्या संध्याकाळी तो सुटाबुटात आला. खबऱ्याने त्याला ओळखला. मी काही कळायच्या आत त्याच्यावर झडप घातली. त्याच्याकडे त्यावेळी रिव्हॉल्व्हर होते. ते पहिल्यांदा काढून घेतले. नंतर त्याच्या साथीदारांना पकडलं. बरीच हत्यारे, स्मोक बाँब त्याच्याकडे सापडले."
अंधारात पोलिसांना 'चकवा'
दिल्लीपर्यंत ही खबर पोचली. अशोका हॉटेलमधील चोरी प्रकरणी तो हवाच होता. ते लोक आले, त्याला दिल्लीला घेऊन गेले. शोभराज अत्यंत चतुर आणि चपळ होता. त्याने काही तरी दुखत असल्याचे कारण दिले. त्याची रवानगी एक दवाखान्यात झाली. त्यावेळी भारत-पाक युद्ध सुरू झाले होते. म्हणून संपूर्ण ब्लॅक आऊट जारी करण्यात आला होता. त्याचा फायदा घेऊन तो फरार झाला. त्यानंतर त्याने अनेक देशांत अनेक महिलांना फुस लावून, प्रेमाचे नाटक करून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू लुटल्या आणि त्यांचे खून केले.
काही देशांमध्ये त्याला अटकही झाली. पण प्रत्येकवेळी तो फरार झाला. नंतर तो भारतात आला. त्यावेळी माझी बदली कुलाब्याला होती. म्हणून मुंबईतील ताज हॉटेलच्या सुरक्षा विभागाला मी शोभराजबद्दल आधीच कल्पना दिली होती. पण काही दिवसांतच त्याच हॉटेलमध्ये एक परदेशी जोडपे बेशुद्धावस्थेत सापडले. ते भानावर आल्यावर त्यांना फोटो दाखवल्यावर त्यांनी शोभराजला लगेच ओळखले. मात्र तो फरार झाला होता. एक दीड महिन्यानंतर त्याच हॉटेलमध्ये तो एक कॅनडियन मुलीबरोबर तो चहा पित बसला होता.
तो सुरक्षा यंत्रणेच्या लक्षात आले. त्यांनी सावध होऊन मला कळवण्यासाठी फोन उचलला, त्यावेळी शोभराज सावध झाला आणि मुलीला घेऊन बाहेर पळाला. तेथील यंत्रणा सतर्क झाली आणि त्यांनी त्याच्या पाठलाग केला, तर रिट्झ हॉटेलमध्ये गेला. याची खबर आम्हाला मिळाली. पोलिस पोचेपर्यंत त्याने त्या मुलीला तशीच टाकली आणि चर्चगेटच्या गर्दीत तो दिसेनासा झाला.
तिहारमधून पलायन
दिल्ली पोलिसांनी त्याला नंतर 1976 मध्ये अटक झाली. तिहार जेलमध्ये त्याला डांबण्यात आले. त्या काळात त्याने आरोपी, पोलिस यांना आपलेसे करून घेतले होते. त्याचाच फायदा त्याने घेतला. त्याच्या वाढदिवसाची पार्टी त्याने 16 मार्च 1986 रोजी दिली. त्यावेळी पोलिसांना केक खायला दिला आणि सगळे बेशुद्ध पडले. त्यावेळी 15 आरोपी तुरुंगातून पळाले. त्याला चांगला ओळखणारा एक पोलिस अधिकारी असल्याची माझी ओळख होती. म्हणून मला बोलावण्यात आले.
गोव्यात झडप अन् झेंडे प्लेटर
गोव्यात आमची शोधमोहीम सुरू झाली. तेथे परदेशी लोकांचा राबता असलेल्या हॉटेलवर आम्ही पाळत ठेवली. परदेशी लोक देशाबाहेर दूरध्वनी कुठून करतात, हे शोधले. तेव्हा लक्षात आले की लोक दूरध्वनी करण्यासाठी सरकारी यंत्रणेपेक्षा 'ओ कोक्यूरो' या हॉटेलमधून लोक परदेशात फोन करतात, अशी माहिती मिळाली. म्हणून दिवसभर त्याला शोधून नंतर या हॉटेलात आम्ही पाळत ठेवत असू. आम्ही असे बसलेले असतानाच 6 एप्रिल 1986 रोजी सायंकाळी एक फियाटमधून दोघेजण हॉटेलमध्ये आले.
त्यातील एकाच्या डोक्यावर सनकॅप होती. मला संशय आल्याने जर न्याहाळून पाहिल्यानंतर तो शोभराज असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्याकडे हत्यार असणार हे जाणून होते. म्हणून तो बेसावध असताना, त्याच्यावर झडप घातली. 'चार्ल्स'.. असा जोरात आवाज टाकला. 'हू चार्ल्स,' तो ओरडला. मग मी त्या म्हटलं, डोन्ट फरगेट, आय एम मधुकर झेंडे. तुला आधी मीच अटक केलीये. मग तो शांत झाला. त्याला जेरबंद केले.
हॉटेलमधून साहित्य घेऊन त्याचे हातपाय बांधले आणि त्याला पोलिस गाडीत आडवा झोपवला. वरिष्ठांना तातडीने कळविले. पोलिस दलात आनंदी-आनंद होता. गोव्यातून महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर आमचे पनवेलमध्ये जंगी स्वागत झाले. माझ्या धाडसाचे कौतुक म्हणून नंतर या हॉटेलने 'झेंडे प्लेटर' अशी खाद्याची डिश सुरू केली. पुढे त्याला 20 वर्षांची शिक्षा त्याला झाली, असे त्यांनी सांगितले.
अमाप माया
तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने मुलाखती द्यायला सुरवात केली. पुस्तके लिहिली. त्यातून त्याने लाखो रुपये मिळवले. त्यावेळी तो अर्धा तास मुलाखत देण्यासाठी दहा हजार डॉलर घेत असे. हेच पैसे तो कसिनो वगैरेमध्ये उडवायचा. त्यासाठी एकदा नेपाळला गेला. तिथे दोन खुनांमध्ये तो वाँटेड होता. तिथे त्याला अटक झाली. आता शिक्षा भोगून तो मुक्त होणार आहे. पण एवढ्या महिलांचे खून करूनही त्याला फाशी होऊ नये, हे आपले दुर्दैवच म्हणावे लागेल, अशी खंत झेंडे व्यक्त करतात.
रंगेल, ऐय्याष
चार्ल्स शोभराज हा फार बेरकी गुन्हेगार होता. तसाच तो रंगेल आणि ऐयाष होता, असे सांगत, झेंडे म्हणाले, "महिलांना फूस लावून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणे, हे त्याला सहज जमत होते. नेपाळमध्ये त्याची केस लढवणाऱ्या वकिलाच्या तिशीतील मुलीला त्याने फूस लावून तिच्याशी तुरुंगात लग्न केल्याची बातमी माझ्या वाचनात आहे. यावरून तो कसा आहे, हे लक्षात येईल. त्याचे राहणीमान अतिशय उंची. भारी कपडे, गॉगल, महागड्या गाड्या तो वापरत असे."