‘डेज्‌’वर बंदी; छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 जानेवारी 2020

वैयक्तिक जीवनाचा व देशाचा उद्धार करायचा असेल, तर शिवाजी महाराजांचे चरित्र आपल्याला कळायला हवे. त्यासाठी हा उपक्रम मोलाचा आहे. 
- बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक

पुणे - ‘रोझ डे’, ‘चॉकलेट डे’, ‘प्रपोज डे’ साजरे करण्याची महाविद्यालयीन तरुण-तुरुणींमध्ये क्रेझ असते. मात्र, सर परशुराम महाविद्यालयात ‘डेज्’ संस्कृतीला फाटा देत तरुण-तरुणांनी पारंपरिक वेशात वाजत-गाजत, जल्लोषात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढून एका अगळ्यावेगळ्या उपक्रमाला सुरुवात केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जानेवारी-फेब्रुवारी महिना आला की महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ‘डेज्‌’ साजरे केले जातात. गेल्या काही वर्षांत या ‘डेज्‌’चा प्रभाव प्रचंड वाढला असून, महाविद्यालयांच्या बाहेर फ्लेक्‍सबाजीही केली जात आहे. स. प. महाविद्यालयाने या सर्व ‘डेज्‌’वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून, महाविद्यालयाने ठरविलेल्या वेळापत्रकानुसार विविध उत्सव साजरे केले जाणार आहेत.

पुण्यात देशातील सर्वांत उंच बिल्डींगवर फडकणार 'तिरंगा'!

विद्यार्थ्यांनी काढलेल्या मिरवणुकीत माजी विद्यार्थी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप सेठ हेदेखील सहभागी झाले होते.

उपाहारगृहापासून मिरवणुकीची सुरुवात होण्यापूर्वी पुरंदरे, सेठ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करण्यात आली. ढोल-ताशांच्या ठेक्‍यात मिरवणुकीला सुरुवात होताच पारंपरिक वेशातील विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या.

प्राचार्य सेठ म्हणाले, ‘‘लव्ह यू डे’, ‘चॉकलेट डे’ या ‘डेज्‌’मुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत नाही. त्यामुळे महाविद्यालयातील हे दिवस बंद करण्यात आले आहेत. महाविद्यालयाच्या ‘ऊर्मी’ या सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत हा पालखी सोहळा काढण्यात आला. इतर महाविद्यालयांनीही असे कार्यक्रम सुरू केले पाहिजेत.’’

विद्यार्थी गंधार करडे म्हणाला, ‘‘डेज्‌’ला बिभत्स रूप मिळत असून, मुलींची छेडछाड, दारू पिऊन महाविद्यालयात मुले येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावामुळे विद्यार्थी एकत्र येऊन चांगले काहीतरी करू शकतात. त्यासाठी उपक्रम राबविला जात आहे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chatrapati Shivaji Maharaj Rally in Pune