
इंदापूर (पुणे) : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी घोषित केलेल्या संचारबंदीत इंदापूर- अकलूज (जि. सोलापूर) राज्य मार्गावरील अकलूज हद्दीतील पोलिस तपासणी नाका इंदापूर तालुक्यातील रुग्णांसाठी मृत्यूचा सापळा ठरला आहे. रुग्णाला उपचारासाठी अकलूजला घेऊन जाणाऱ्या नातेवाइकांना येथील अधिकाऱ्यांकडे प्रवेशासाठी अक्षरशः भीक मागावी लागत आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेला पासचीही येथे दखल घेतली जात नाही. त्यामुळे उपचाराअभावी या आठवड्यात तीन जणांना मृत्यू आला आहे.
इंदापूर व अकलूजचे व्यापार, आरोग्य, शेती, सहकारी साखर कारखान्यामुळे पहिल्यापासून नाते आहे. अकलूजमध्ये वैद्यकीय सुविधा जास्त उपलब्ध असल्याने इंदापूरकर अकलूजला अनेक वर्षांपासून प्राधान्य देत आहेत. मात्र, संचारबंदीमुळे पोलिस इंदापूरच्या लोकांना अकलूजमध्ये प्रवेश देत नाहीत. तसेच, अकलूजच्या डॉक्टरांनी लिहिलेली औषधे इंदापूरला मिळत नसल्याने रुग्णांची अवस्था केविलवाणी झाली आहे. एकीकडे कोरोनाची भीती; तर दुसरीकडे औषधे मिळत नसल्याने ज्येष्ठ नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. इंदापूर तालुक्याच्या यासह विविध प्रश्नांवर माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोलापूर जिल्हाधिकारी व पोलिस प्रमुख यांच्याकडे चार दिवसांपूर्वीच चर्चा केली, मात्र या अधिकाऱ्यांनी त्यास वाटाण्याच्या अक्षदा दाखविल्या आहेत.
इंदापुरात डॉक्टर व पत्रकार असलेल्या एका व्यक्तीच्या चुलत्याचे (वय 78) पडल्यामुळे नुकतेच खुब्याचे हाड मोडले. त्यामुळे 22 एप्रिल रोजी त्यांचे मोठे ऑपरेशन झाले. 21 एप्रिलला त्यांना रुग्णवाहिकेमधून अकलूजला नेताना या तपासणी नाक्यावर सर्व पास असताना पाऊण तास थांबविण्यात आले. त्यामुळे त्यांच्या लघवीच्या पिशवीतून रक्त गेले. त्यामुळे दोन बाटल्या रक्त व प्लाजमा भरून त्यांचे ऑपरेशन करण्यात आले.
दरम्यान, संबंधित डॉक्टर व पत्रकार आपल्या चुलत्यांना 23 एप्रिल रोजी औषधे देण्यास गेले असता त्यावर सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा नोंदविण्याचा दम देण्यात आला. तसेच, त्यांनी पास व आपले ओळखपत्र दाखविले असता, सोलापूर जिल्ह्यात बंदी असल्याचे सांगून, "आम्ही फक्त सोलापूर जिल्हा पोलिस प्रमुखाचेच ऐकतो,' असे सुनावले. त्यावर पत्रकाराने, सामान्य प्रशासन राज्यमंत्री तथा इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहेत, असे त्यांना सांगितले. मात्र, "कोण राज्यमंत्री व पालकमंत्री? त्यांना आम्ही ओळखत नाही,' असे वक्तव्य अधिकाऱ्याने उद्दामपणे केले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करून त्यांची खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी पत्रकारांनी केली आहे.
मंत्र्यांच्या "पीए'ला विशेष सवलत
अकलूजच्या या तपासणी नाक्यावर रुग्णांची अडवणूक होत असताना या उलट राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या स्वीय सहायकाचा फोन आला की, त्यांनी सांगितलेल्या गाड्या कुठलीही तपासणी न करता लगेच सोडल्या जात आहेत. इतर माल वाहतूक करणाऱ्या वाहकाशी अर्थपूर्ण घडामोडी होत असून, गाडीतील फळे, तरकारी जबरदस्तीने काढल्याशिवाय गाड्या सोडल्या जात नाहीत. पोलिसांच्या अरेरावीमुळे सर्वजण त्रस्त झाले असून, ते पोलिसांच्या पंटरकडे मांडवली करून आपली सुटका करून घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.