रासायनिक कचरा, धुराचे प्रदूषण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

मोशी - अनधिकृत उभारलेल्या ॲसिड, प्लॅस्टिक मोल्डिंग कारखान्यांमधून निघणारा विषारी वायू, पेटविला जाणारा रसायनयुक्त कचरा आणि भंगार गोदामांना लागणाऱ्या आगीतून निघणाऱ्या विषारी धुरामुळे मोशी, चिखली, तळवडे, कुदळवाडी, जाधववाडी परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.

मोशी - अनधिकृत उभारलेल्या ॲसिड, प्लॅस्टिक मोल्डिंग कारखान्यांमधून निघणारा विषारी वायू, पेटविला जाणारा रसायनयुक्त कचरा आणि भंगार गोदामांना लागणाऱ्या आगीतून निघणाऱ्या विषारी धुरामुळे मोशी, चिखली, तळवडे, कुदळवाडी, जाधववाडी परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.

प्रशासनाच्या डोळेझाकपणामुळेच येथील अनधिकृत व्यवसाय वाढतच चालले आहेत. भरमसाट कर भरत असून हक्काचा शुद्ध प्राणवायू येथे मिळत नाही. तो तरी मोफत मिळणार की नाही, की त्यासाठीही कर भरावा लागणार? असा संतप्त प्रश्‍न स्थानिकांनी उपस्थित केला आहे. तळवडे आयटी पार्क आणि भोसरी-चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये हजारो नागरिकांनी सदनिका घेतल्या आहेत. अनेक जागामालकांनी खातरजमा न करता रसायन कारखाने आणि भंगार गोदामांसाठी जागा विकल्या आहेत. काहींनी भाडेतत्त्वावर दिल्या आहेत.

या कारखान्यांमधून ॲसिड, रसायन, प्लॅस्टिक मोल्डिंग यांसारखी उत्पादने घेतली जातात. त्यामधून अत्यंत विषारी वायू, धूर रसायनमिश्रित पाणी बाहेर पडत आहे. हे टाकाऊ रसायनयुक्त पदार्थ जाळले जातात. नंतर हे विषारी पाणी इंद्रायणीमध्ये सोडले जाते. या गोदामांना वारंवार आगी लागून विषारी धूर चार ते पाच किलोमीटर परिसरामध्ये पसरतो. नागरिकांच्या जिवावर उठलेल्या या कारखाने, गोदामांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

येथील प्रदूषणाचा प्रश्‍न गंभीर झाला असून, प्रशासनाने गोदामे आणि रसायननिर्मिती कंपन्यांवर कारवाई करावी, अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल. विधानसभा, लोकसभा निवडणुकांपूर्वी गोदामे आणि रसायननिर्मिती कंपन्या अन्यत्र हलविण्यात याव्यात.  
- विकास साने, अध्यक्ष, चिखली-मोशी गृहनिर्माण सोसायटी फेडरेशन

स्थानिकांना श्‍वसनाचे आजार जडले आहेत. लहान मुलांच्या डोळ्यांची आग, नाक, घसा लाल होत असून  स्थानिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.
- मल्हारी मदने, स्थानिक नागरिक, चिखली 

Web Title: chemical garbage Smoke pollution