पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून रसायन, मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

पिंपरी- चिंचवड महापालिकेकडून रसायन, मैलामिश्रित सांडपाणी थेट इंद्रायणी नदीच्या पात्रात सोडले जात आहे, त्यामुळे पाणी दूषित होऊन पिकांवर त्याचा दुष्परिणाम होत आहे. तसेच, जलचरांनाही धोका वाढला आहे.

कुरुळी - पिंपरी- चिंचवड महापालिकेकडून रसायन, मैलामिश्रित सांडपाणी थेट इंद्रायणी नदीच्या पात्रात सोडले जात आहे, त्यामुळे पाणी दूषित होऊन पिकांवर त्याचा दुष्परिणाम होत आहे. तसेच, जलचरांनाही धोका वाढला आहे.

कुरुळी खेड तालुक्‍याच्या दक्षिण भागातून वाहणारी, तीर्थक्षेत्र देहू- आळंदी व शेतीला वरदान असणारी इंद्रायणी नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहत असते. या वर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने ती दरवर्षीच्या तुलनेत पूर्णपणे स्वच्छ झाली आहे. सध्या धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. पिंपरी- चिंचवड महापालिकेने कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात रसायन, मैलामिश्रित सांडपाणी सोडले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 परिणामी, नदीतील पाणी दूषित होत आहे. हे पाणी जनावरेही पीत नसल्याचे चित्र आहे. सातत्याने हे पाणी नदीपात्रात सोडल्याने जलचर प्राणीदेखील कमी होत आहेत. नदीकाठच्या गावांतील शेतकऱ्यांनी सुमारे जुडीला वीस ते चाळीस रुपये खर्च करून कांदा रोपांची लागवड केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 

या पाण्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, मोई-चिखली पुलाजवळच्या ओढ्यावर स्वतंत्र पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसवावी, अशी मागणी सरपंच राहुल गवारी, उपसरपंच गीतांजली गवारी, सरपंच रमेश गायकवाड, उपसरपंच  नीलेश पवार, माजी सरपंच एकनाथ करपे, अरुण फलके, संदीप जाधव, उद्योजक प्रसाद करपे, जालिंदर गवारी, आनंद गवारी यांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांकडून होत आहे. परिसरातील कांद्याच्या पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
- सचिन कड, सरपंच, कुरुळी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chemical mixed sewage from the Pimpri-Chinchwad Municipal Corporation directly into the river