

बारामती, ता. ३ : हातउसने घेतलेल्या १५ लाख रुपयांच्या परतफेडीसाठी दिलेले धनादेश न वटल्याप्रकरणी संतोष सोमनाथ करे (रा. कण्हेरी, ता. बारामती) यांना सहा महिन्यांचा कारावास व ३० लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) प्रीतेश भंडारी यांनी सुनावली.
कण्हेरी येथील शंकर विठ्ठल काळे यांनी संतोष सोमनाथ करे यांना दूध डेअरी व्यवसायासाठी १५ लाख रुपये हातउसने दिले होते. याबाबत दोघांमध्ये करारनामा करण्यात आला होता. करारनाम्यात नमूद केल्यानुसार ही रक्कम एका वर्षाच्या आत परत करण्याचे करे यांनी मान्य केले होते. त्यानुसार रकमेच्या परतफेडीसाठी त्यांनी काळे यांना दोन धनादेश दिले होते. शंकर काळे यांनी हे दोन्ही धनादेश त्यांच्या बँक खात्यात जमा केले असता ते न वटता परत आले. त्यानंतर काळे यांनी बारामती येथील न्यायालयात चेक बाउन्सप्रकरणी खटला दाखल केला होता.
फिर्यादी शंकर काळे यांच्या वतीने ॲड. राजेंद्र काळे यांनी कामकाज पाहिले. न्यायालयाने दंडाची रक्कम ३० दिवसांच्या आत भरण्याचे आदेश दिले असून, त्यापैकी २९ लाख ९० हजार रुपये फिर्यादी शंकर काळे यांना नुकसानभरपाई म्हणून देण्यात यावेत, असे आदेश दिले आहेत. उर्वरित दहा हजार रुपये न्यायालयात दंड म्हणून जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या खटल्यात फिर्यादींच्या वतीने ॲड. राजेंद्र काळे, ॲड. आदेश काळे, ॲड. प्रगती माळवे, ॲड. तुषार कवडे, ॲड. मनीष जाधव, ॲड. संतोष भोईटे आणि ॲड. आकाश साबळे यांनी सहकार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.