पुण्यातील बुद्धिबळ महर्षी जोसेफ डिसूझा यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 November 2020

डिसूझा यांनी अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले. तर प्रमुख पंच म्हणून 1984 पासून विविध स्पर्धांमध्ये जबाबदारी पार पाडली. डिसूझा हे निष्णांत बुद्धिबळ खेळाडू म्हणूनही प्रसिद्ध होते.

पुणे : बुद्धिबळातील शिवछत्रपती पारितोषिक विजेते, पुणे जिल्हा बद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ बुद्धिबळ प्रशिक्षक जोसेफ डिसूझा (वय 58) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी आणि मुलगा आहे.

डिसूझा हे 1989 पासून बुद्धिबळाचे प्रशिक्षण विद्यार्थी आणि युवकांना देत होते. या काळात त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू घडविले. त्यात ग्रॅन्डमास्टर अक्षराज कोरे, कृतिका नाडीग, आंतरराष्ट्रीय मास्टर शशिकांत कुतवळ, जागतिक अंध बुद्धिबळ विजेता राजेश ओझा, जागतिक शालेय बुद्धिबळ विजेता गौरव कोंडे तसेच 300 हून अधिक आंतरराष्ट्रीय गुणांकित खेळाडू आणि विविध वयोगटातील राष्ट्रीय विजेते घडविले आहेत. त्यामुळेच त्यांना राज्य सरकारचा प्रशिक्षकपदाचा श्री शिवछत्रपती पुरस्कार मिळाला.

डिसूझा यांनी अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले. तर प्रमुख पंच म्हणून 1984 पासून विविध स्पर्धांमध्ये जबाबदारी पार पाडली. डिसूझा हे निष्णांत बुद्धिबळ खेळाडू म्हणूनही प्रसिद्ध होते. आंतरराष्ट्रीय बद्धिबळ महासंघाचा "कॅडिडेट मास्टर' हा किताब त्यांनी पटकावला होता. राष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक वर्षे त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्त्व केले. चार वेळेस मध्य महाराष्ट्र बुद्धिबळ अजिंक्‍यपद स्पर्धा जिंकणारे ते एकमेव खेळाडू होते. आंतर औद्योगिक बुद्धिबळ अजिंक्‍यपद 3 वेळा मिळविणारे ते पुण्याचे पहिले खेळाडू होते.

हे वाचा - Corona Update - पुणे जिल्ह्यात 368 नवे रुग्ण; 16 जणांचा मृत्यू

राजस्थानातील पिलानी येथे 1999 येथे पार पडलेल्या आंतरविद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेतील विजेत्या पुणे विद्यापीठ संघाचे ते प्रशिक्षक होते. स्पेनमध्ये 2003 मध्ये झालेल्या अंधांच्या जागतिक कुमार बुद्धिबळ अजिंक्‍यपद स्पर्धेत ते भारताचे प्रशिक्षक होते. स्पेनमध्ये 2004 मध्ये झालेल्या जागतिक बुद्धिबळ ऑलिंम्पियाड स्पर्धेत भारताचे उपप्रशिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. एमआयटी क्रीडा आचार्य पुरस्कार 2015 मध्ये त्यांना मिळाला होता. बुद्धिबळ स्पर्धेतील रोटरी ऍवॉर्ड 2004 मध्ये त्यांना मिळाले होते. मुंबईत 1998 मध्ये मानाचा रोचेस ऍवॉर्डही त्यांना मिळाले होते. "चेस ऑयडॉल ऑफ महाराष्ट्र' हा पुरस्कार त्यांना 2017 मध्ये मिळाला.

एक उत्कृष्ट खेळाडू, संघटक, पंच, स्पर्धा संयोजक, प्रक्षिशक म्हणून संपूर्ण देशात त्यांना ओळखले जात. पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव राजेंद्र कोंडे यांनीही त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तर, "श्रीमंत मनाचा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू व कुशल संघटक काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे बुद्धिबळ क्षेत्राची हानी झाली आहे,' अशा शब्दात राज्य बुद्धिबळ खेळाडू व संघटक प्रकाश देशपांडे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

आमदार तापकीर यांच्या कपात सूचनेला गृहराज्यमंत्री सतेश पाटील यांचे उत्तर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chess Maharshi Joseph D'Souza of Pune passes away