

पाचशे कोटींचे आरोप
म्हणजे चावडीवरच्या गप्पा!
छगन भुजबळ : दुष्काळ निवारणास प्राधान्य द्यावे
सकाळ वृत्तसेवा
येवला (जि. नाशिक), ता.२३ : ‘‘कोणी कोणाला ५०० कोटी रुपये दिले नाहीत अन् कोणी ते घेतलेही नाहीत. या केवळ ‘पारावरच्या गप्पा’ आहेत. अशा गप्पा कोण ‘रेकॉर्ड’ करतो, हा प्रश्न आहे. भाजपला पैसे द्यायचेच असते तर त्यांनी स्वतः जाऊन दिले असते; त्यासाठी कोणाचीही मध्यस्थी लागली नसती,’’ अशा शब्दांत राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराच्या मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपावर प्रतिक्रिया दिली. यापेक्षा दुष्काळग्रस्त आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
येवला दौऱ्यावर आलेल्या भुजबळ यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले, की दुष्कालात आता पाण्याचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक असून, पाण्याचा अपव्यय टाळण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. विशेषतः फळबागा जगविणे, शेतकऱ्यांना तातडीचा आर्थिक दिलासा देणे व जनावरांसाठी पाणी व चाऱ्याची उपलब्धतेस प्राधान्य द्यावे लागणार आहे. नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी पंचनामे, माहितीची पडताळणी सुरू आहे. ही मोठी प्रक्रिया असून ती पूर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा म्हणून किमान पाच हजार रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला. लवकरच ही रक्कम वितरित केली जाईल. शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणे गरजेचे असून, मदत प्रक्रियेत अचूकता व गती या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहे. अशा परिस्थितीत राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. मुंबई-नाशिक महामार्गाच्या दुरवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त करून भुजबळ यांनी इगतपुरी ते नाशिक व पुढे ठाण्यापर्यंत अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था खराब असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.