Sambhaji Raje : आताचेही काही प्रस्थापित माजलेले; छत्रपती संभाजीराजेंचा घणाघात | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhatrapati Sambhaji Raje Bhosale

Sambhaji Raje : आताचेही काही प्रस्थापित माजलेले; छत्रपती संभाजीराजेंचा घणाघात

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्यातून सुराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी वर्षभरापूर्वी स्वराज्य या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेचे आता पक्षात रूपांतर करणार आहे. सत्तेतून सुराज्य निर्माण करता यावे. जेणेकरून शिवाजी महाराजांचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. यासाठी स्वराज्य संघटना येत्या २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा स्वराज्य या संघटनेचे प्रमुख, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शनिवारी (ता.२७) पुण्यात एका जाहीर कार्यक्रमात बोलताना केली.

या निवडणुकीच्या तयारीसाठी आतापासूनच कामाला लागा, असा आदेश त्यांनी यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला. आज संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वराज्य या संघटनेच्या ‘स्वराज्य भवन’ या कार्यालयाचे लोकार्पण सर्वसामान्य नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर या संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात आले.

या अधिवेशनात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी संयोगिताराजे, छत्रपती शहाजीराजे संघटनेचे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव, संपर्कप्रमुख करण गायकर आदी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, ‘‘स्वराज्यातून सुराज्य स्थापित करणे, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न होते. महाराजांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी वर्षभरापूर्वी स्वराज्य या संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेचे आता पक्षात रूपांतर केले जाईल. यासाठी गाव तेथे स्वराज्याची शाखा आणि घरोघरी स्वराज्य याची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. या संघटनेच्या शाखा स्थापन करण्यासाठी राज्यभर दौरे केले.

या दौऱ्यामध्ये लोकांच्या स्वराज्य संघटनेकडून खूप आशा आणि अपेक्षा असल्याचे दिसून आले. लोकांच्या या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सत्तेत असणे आवश्‍यक आहे. यासाठी सत्तेतून सुराज्य साकार करता यावे, या उद्देशाने येत्या २०२४ मध्ये होणारी विधानसभा निवडणूक लढविण्यात येणार आहे.’’

अधिवेशनापूर्वी डॉ. श्रीकुमार बुरसे, ॲड. ओंकार येनपुरे, वारकरी माऊली गुरव, रिक्षाचालक किशोर मोरे, शेतकरी, महिला आणि विद्यार्थी आदी सर्वसामान्यांच्या हस्ते स्वराज्य भवन या कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर या कार्यालयापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत छत्रपती संभाजीराजे, संयोगिताराजे, शहाजीराजे यांच्यासह कामगार, शेतकरी, कष्टकरी, महिला आणि विद्यार्थी हे मावळ्यांच्या वेशात सहभागी झाले होते. डॉ. धनंजय जाधव यांनी प्रास्ताविक केले. राहुल गिरी याने सूत्रसंचालन केले.

पंचसूत्रीच्या माध्यमातून सामान्यांचा विकास’

छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यात स्वराज्य स्थापन केले. त्यावेळी तेव्हाचे प्रस्थापित लोक हे कधीच महाराजांसोबत नव्हते. आताची परिस्थितीसुद्धा वेगळी नाही. आताही काही प्रस्थापित हे माजलेले दिसत आहेत. सध्या तेच राजकारणी, तीच चर्चा, तेच खोटं बोलणं हे चालू आहे. यापुढे हे चालणार नाही. सामान्य, शेतकरी, कष्टकरी यांना ताकद देण्याचे काम करायचे आहे. त्यामुळे स्वराज्य संघटना ही शेतकरी, कामगार, सहकार, शिक्षण आणि आरोग्य या पंचसूत्रीच्या माध्यमातून सामान्यांचा विकास करणार आहे.

शिवाजी महाराजांनी अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली होती. त्यांचे दोन टक्के गुण जरी आपण अंगीकारले तरी, आपण राज्यात सत्ता स्थापन करू शकू. मी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचा वंशज म्हणून नव्हे तर, शिलेदार म्हणून बाहेर पडलो असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी सांगितले.