

लोणावळा, ता. १० : लोणावळा नगर परिषदेच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या कामाला पुन्हा गती मिळाली असली तरी हे काम नेमके कधी पूर्ण होणार, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियान आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे साडेतीन कोटी रुपयांहून अधिक खर्च करून लोणावळा शहरातील बाजारपेठ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणे तसेच परिसराचे सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शहरातील सर्वपक्षीय नेते, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी यांच्या उपस्थितीत शिवजयंतीदिनी या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र, या भव्य स्मारकाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू असून विविध कारणांमुळे ते रखडले होते. शिवजयंतीच्या मुहूर्तावर स्मारक पूर्ण होईल, अशी नागरिकांची अपेक्षा होती. दरम्यान, स्मारकाचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी हिंदू समिती, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह विविध संघटनांनी वेळोवेळी निवेदने दिली होती. तसेच आजी-माजी नगरसेवक आणि विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण आंदोलनही केले होते. सध्या स्मारकाचे काम पुन्हा प्रगतिपथावर आहे. नगरपालिका प्रशासनाकडून कामाची पाहणीही करण्यात आली आहे. काम अंतिम टप्प्यात असून, नियोजित वेळेत आणि दर्जेदार काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
‘‘स्मारकाचे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावे यासाठी नुकतीच नगरपालिका प्रशासनाकडून कामाची पाहणी करण्यात आली आहे. सध्या काम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- राजेंद्र सोनवणे, नगराध्यक्ष
‘‘छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आमच्या आस्थेचा विषय असून, येत्या महाराष्ट्र दिनापर्यंत (१ मे) स्मारकाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
- देविदास कडू, उपनगराध्यक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.