योजना मंजूर, प्रत्यक्ष अंमलबजावणीला मुहूर्त कधी?

योजना मंजूर, प्रत्यक्ष अंमलबजावणीला मुहूर्त कधी?
Published on: 

योजना मंजूर, प्रत्यक्ष अंमलबजावणीला मुहूर्त कधी?
‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजने’बाबत पुन्हा खुलासा; आता ‘लवकरच’ ऑनलाइन अर्जाचा दावा

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ७ : पशुपालनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी व पशुपालकांना उद्योजकतेची संधी देण्यासाठी शासनाने मंजूर केलेली ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना’ अद्याप प्रत्यक्ष सुरू झालेली नाही. महाराष्ट्र दिनी (ता. १ मे) योजना सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतरही लवकरच ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होईल, असे वेळोवेळी सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष योजना सुरू होण्याऐवजी समाजमाध्यमांवरील माहितीबाबत पशुसंवर्धन विभागाकडून पुन्हा खुलासा करण्यात आला आहे. त्यामुळे सोलापूरसह राज्यातील शेतकरी-पशुपालकांची योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची प्रतीक्षा कायम आहे.
योजनेची अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी ऑनलाइन प्रणाली विकसित करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. ही प्रणाली तयार झाल्यानंतर महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज मागविले जाणार आहेत.
दरम्यान, योजनेच्या नावाने समाजमाध्यमांवर विविध संदेश व जाहिराती प्रसारित होत असल्याने विभागाला यापूर्वीही खुलासा करावा लागला होता. आता पुन्हा नागरिकांना अशा माहितीपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही खासगी व्यक्ती किंवा संस्थेला योजना राबविण्यासाठी शासनाने अधिकृत केलेले नसल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
योजनेबाबत अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतरच अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज भरताना अडचण किंवा शंका असल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा किंवा १९६२ या टोल-फ्री क्रमांकावर माहिती घ्यावी, असे विभागाने म्हटले आहे.

चौकट
केवळ आधारकार्ड, महाआयडी क्रमांक लागणार
महाडीबीटी पोर्टलवर आधारकार्ड किंवा महाआयडी क्रमांकाच्या आधारे अर्ज करता येणार असून, अर्जासाठी आवश्यक ७/१२ उतारा, रेशनकार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र आदी कागदपत्रे ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे.

योजना कागदावर, पशुपालक प्रतीक्षेत
दुधाळ जनावरे, शेळी-मेंढी, कुक्कुट व वराहपालनासाठी अनुदान मिळणार असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याची क्षमता या योजनेत आहे. मात्र, १ मेपासून सुरू होण्याची अपेक्षा असलेल्या योजनेबाबत अद्याप अर्ज प्रक्रियेलाच सुरुवात झालेली नसल्याने ‘लवकरच’च्या घोषणांवर पशुपालकांची प्रतीक्षा कायम आहे. वारंवार होणाऱ्या खुलाशांऐवजी प्रत्यक्ष अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार, याकडे आता पशुपालकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com