बालविवाह होऊ न देण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करावे: माजी गृहमंत्री वळसे पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वळसे पाटील

बालविवाह होऊ न देण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करावे: माजी गृहमंत्री वळसे पाटील

मंचर : “बालविवाह ही प्रथाच चुकीची आहे. यामुळे लहानग्यांचे बालपण खुंटते.बालविवाह होऊ न देण्यासाठी समाजातील सर्व स्तरांवर चळवळ उभी राहिली पाहिजे, त्यासाठी विविध पातळ्यांवर कार्य करणारी सक्षम यंत्रणा समाजातून तयार झाली पाहिजे. ही प्रथा बंद करण्यासाठी अनेक गावात मोहीम हाती घेण्याचा ज्ञानशक्ती विकास वाहिनी, कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन नवी दिल्ली (नोबेल पुरस्कार विजेते) व व आंबेगाव तालुका पंचायत समितीने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.” असे राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

मंचर (ता.आंबेगाव) येथे रविवारी (ता.१६) बालविवाह मुक्त भारत अभियान शुभारंभ प्रसंगी वळसे पाटील बोलत होते. यावेळी प्रज्वलित केलेल्या मेणबत्या हातात घेऊन या अभियानाचा शुभारंभ झाल्याचे वळसे पाटील यांनी जाहीर केले. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, उद्योजक अण्णासाहेब भोर, सुभाषराव मोरमारे, कामगार नेते अँड.बाळासाहेब बाणखेले, संजय गवारी,सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर, अजय घुले,काळूराम दांगट,संतोष टाव्हरे, संदीप टेमकर,वैभव वळसे पाटील, उपस्थित होते.

“वाढत्या बालविवाहांना आळा घालण्यासाठी व बालविवाह विरोधात जनजागृती करण्यासाठी “बालविवाह मुक्त भारत” या उपक्रमाला आंबेगाव तालुक्यातील १०3 ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालये, दवाखाने, अंगणवाड्या, राजकीय क्षेत्रातील मान्यवर यांचा उत्स्पुर्त प्रतिसाद मिळाला आहे. आंबेगाव तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे विशेषतः महिला बचत गट,माध्यमिक व महाविद्यालयामध्ये चर्चा सत्राद्वारे प्रभावी जनजागृती करण्याचे काम केले जाईल.” असे ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गार्गी काळे पाटील यांनी सांगितले.नीलम भोर यांनी प्रास्ताविक व अरुण गभाले यांनी आभार मानले.