esakal | विद्यार्थी झाले बालसंपादक
sakal

बोलून बातमी शोधा

सकाळ कार्यालय - बालअतिथी संपादक उपक्रमातंर्गत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष वर्तमानपत्राच्या कामकाजाचा अनुभव घेतला.

सहभागी शाळा
नवमहाराष्ट्र विद्यालय (पिंपरी), एच. ए. विद्यालय (पिंपरी), शिक्षण प्रसारक मंडळी मराठी व इंग्रजी माध्यम शाळा (निगडी), मॉडर्न हायस्कूल (निगडी), पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय नेहरूनगर, कन्या विद्यालय (पिंपरी), ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय (निगडी प्राधिकरण), सरस्वती विद्यालय आकुर्डी, श्रीमती गोदावरी हिंदी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय (चिंचवड), श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा विद्यालय चिंचवड, व्ही. के. माटे विद्यालय, एम. एस. एस. विद्यालय (चिंचवड), मनोरम प्राथमिक व समर्थ माध्यमिक विद्यालय (केशवनगर), सौ. ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला चिंचवड.

विद्यार्थी झाले बालसंपादक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - वृत्तपत्र म्हणजे काय?... ते कसे छापले जाते?... बातम्या कुठून मिळतात?... मीडियाविषयी उत्सुकता... त्याच्या कार्यपद्धतीविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा... याबाबत चेहऱ्यावर कुतूहल... असे वातावरण ‘सकाळ’च्या पिंपरी कार्यालयाने बुधवारी (ता. १३) अनुभवले. निमित्त होते ‘सकाळ एनआयई’तर्फे बालदिनानिमित्त आयोजित ‘बाल अतिथी संपादक’ उपक्रमाचे. 

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यासाठी ‘सकाळ एनआयई’तर्फे आयोजित उपक्रमात अनेक शाळांमधील विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते.

त्यांनी वृत्तपत्रांची नेमकी भूमिका काय, कार्य कसे चालते, वृत्तांकन कसे करावे, संपादन प्रक्रिया कशी असते, वृत्तपत्राची मांडणी, जाहिराती अशा वृत्तपत्रांच्या कार्यशैलीची माहिती जाणून घेतली. संपादकीय, जाहिरात, वितरण यासह विविध विभागांना भेट देऊन शंकांचे निरसन केले. ‘सकाळ’चे सहयोगी संपादक अविनाश म्हाकवेकर, मुख्य व्यवस्थापक (जाहिरात) मिलिंद भुजबळ, व्यवस्थापक (वितरण) संदीप वाघ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. बातमीदार होण्यासाठी आवश्‍यक कौशल्ये व गुणवैशिष्ट्यांचे विश्‍लेषण केले. 

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा यासाठी ‘सकाळ’मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यांची कात्रणे घेऊन प्रात्यक्षिकाद्वारे अंकाची मांडणी केली. काही विद्यार्थ्यांनी संपादक, उपसंपादक आणि बातमीदारांची भूमिका पार पाडली. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने विद्यार्थी भारावून गेले. माध्यमांविषयी माहिती जाणून घेण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी ‘सकाळ’चे आभार मानले. 

विशाल सराफ व अक्षया केळसकर यांनी संयोजन केले. या वेळी नीता शेटे, रोहिणी काकडे, सोनल लांडगे, संजय खेडकर, अश्‍विनी रासकर, रंजना चौधरी, अर्चना येळे, एम. एच. लोखंडे, ए. ए. सिरसट, सुषमा बंब, मनीषा कलशेट्टी, ए. एस. औताडे उपस्थित होते. वृत्तपत्राचे कामकाज पाहण्याची प्रथमच संधी मिळाल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी या वेळी दिली.