‘मुलांमध्ये वाचनाची आवड घरातूनच रुजवावी’

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 November 2019

वाचनाने चिंतन-मननाची सवय
दृकश्राव्य माध्यम सोपे वाटत असले, तरी त्यामुळे अस्वस्थता वाढते. वाचनाने एकप्रकारची शांती तर मिळतेच. याशिवाय चिंतन-मनन करण्याची सवय लागते, कल्पनाशक्ती वाढते. बुद्धीचा विकास होण्याबरोबरच विचारांच्या कक्षादेखील रुंदावतात. साहित्य निर्मितीचा ध्यास लागतो आणि विचार प्रवर्तक व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. म्हणून वाचनाची सवय खूप महत्त्वाची आहे, असे डॉ. संगीता बर्वे यांनी सांगितले.

पुणे - रोजच्या जीवनावर दृकश्राव्य माध्यमांचे झालेले अतिक्रमण, कार्टूनचा भडीमार आणि पालकांकडून विसरत चाललेली वाचनसंस्कृती यामुळे लहान मुलांमध्ये वाचनाचे प्रमाण कमी होते आहे. परंतु, मुलांच्या बुद्धी आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास करायचा असेल, तसेच विचारप्रवर्तक समाजाची निर्मिती करायची असेल, तर वाचनाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे विशेषतः घरांमधूनच मुलांमध्ये वाचनसंस्कृती रुजविली गेली पाहिजे, असे मत साहित्य वर्तुळातून व्यक्त होत आहे.

बालदिनाच्या पार्श्‍वभूमीवर लहान मुलांमधील वाचनाच्या आवडीबद्दल आणि त्यासाठी केलेल्या प्रयोगांबाबत साहित्यिक आणि बालकुमार साहित्यकारांची मते ‘सकाळ’ने जाणून घेतली. याबाबत अ. भा. बालकुमार साहित्य संस्थेच्या अध्यक्ष डॉ. संगीता बर्वे यांनी मुलांना घरातून वाचनाची आवड लावली जायला हवी असे मत व्यक्त केले. मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यांना काय आवडेल, याचा विचार करूनही साहित्य निर्मिती केली जात आहे. भोपळ्याचे बी हे मराठी साहित्य पंम्पकिन सीड म्हणून इंग्रजीत चित्ररूपात येत आहे; पण खरी गरज ही त्यांना पुस्तकाविषयी आवड निर्माण करण्याची आहे, असे त्या म्हणाल्या.

घरातल्या महिलेने, खेडेगावातील शिकलेल्या एखाद्या तरुणीने वा शहरातल्या सोसायटीतील नागरिकांनी मुलांना चांगली पुस्तके वाचून दाखविली पाहिजेत किंवा ती त्यांना वाचायला दिली पाहिजेत. यातील त्यांना काय समजले, हेही तपासले पाहिजे. शाळांमध्येही असे प्रयोग सुरू असतात; परंतु ते व्यापक स्तरावर केले, तर मुलांमध्ये निश्‍चितपणे वाचनाची आवड निर्माण करता येईल, असे मत बर्वे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘‘शहरातील बदललेली जीवनशैली, पालकांचा नोकरीत जाणारा वेळ, तसेच अनेक कुटुंबांमध्ये आजी- आजोबा नसतात, त्यामुळे घरात मुलांना गोष्टी सांगितल्या जात नाहीत. यामुळे घरातून वाचन संस्कृती हद्दपार होत चालली आहे. त्यामुळे मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्नच करावे लागतील. त्यांना भाषा- साहित्य यात रस निर्माण होण्यासाठी शाळांमध्ये रंजक पद्धतीने शिकवावे लागेल. तंत्रज्ञानाचे आक्रमण असले, तरी निवासी सोसायट्यांनी चांगल्या दर्जाची पुस्तके मुलांना उपलब्ध करून द्यावीत, ज्येष्ठ लोकांनी त्यांना पुस्तके वाचून दाखविण्याची जबाबदारी घ्यावी, यातूनही मोठा बदल घडू शकेल.’’ बालकुमार साहित्य संस्थेचे कार्यवाह मुकुंद तेलीचरी यांनी सांगितले, की मुले मोठी पुस्तके वाचत नाहीत. त्यांना छोटी पुस्तके दिली पाहिजेत. कथाकथनासारख्या कार्यक्रमांमधून आम्ही वाचनाची आवड निर्माण करतोच; पण सुटीच्या काळात त्यांना घरातूनच पुस्तके वाचायला दिली पाहिजेत.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: childrens day child book reading education