विद्यार्थ्यांनी घेतला चित्रपटांचा आनंद

Baldin
Baldin

पिंपरी - चिंचवड येथील सायन्स पार्कमध्ये बालदिनानिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाल चित्रपटांचा महोत्सव, विज्ञानावर आधारित जादूचे प्रयोग, वैज्ञानिक खेळणी आणि ‘थ्री-डी’ लघुपट या सारख्या गोष्टींचा  बालचमूंनी गुरुवारी (ता. १४) मनसोक्त आनंद घेतला. या केंद्राला दिवसभरात सुमारे पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी भेट दिली.

बालदिनानिमित्त सायन्स पार्कसह भोसरीतील महात्मा ज्योतिबा फुले जागृती मंडळाच्या लांडेवाडी शाळा, दादा महाराज नाटेकर विद्यालय व चिखली येथे गुरुवारपासून शनिवारपर्यंत (ता. १६) बाल चित्रपट महोत्सव भरविण्यात आला आहे. फोर्ब्ज मार्शल कंपनीच्या सहकार्याने हा महोत्सव भरविला असून, त्याचे उद्‌घाटन फोर्ब्ज मार्शलच्या रती फोर्ब्ज यांच्या हस्ते झाले. या वेळी कंपनीच्या सीएसआर समन्वयक बिना जोशी, केंद्राचे संचालक प्रवीण तुपे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) पराग मुंढे, पालिकेचे सल्लागार (सीएसआर) विजय वावळे, संगणक अधिकारी निळकंठ पोमण उपस्थित होते. 

या महोत्सवात दर तासाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रत्येकी १० ते १२ मिनिटांचे चार चित्रपट दाखविण्यात आले. कंपनीच्या स्वयंसेवकांनी विद्यार्थ्यांना मराठीमधून माहिती दिली. याशिवाय चित्रकला स्पर्धा भरविण्यात आली.

त्यामध्ये पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावीपर्यंतच्या दीडशे विद्यार्थ्यांनी भाग घेतला. स्वच्छ सुंदर नदी, स्वच्छता अभियान यांसारख्या विषयांवर मुलांनी चित्रे रेखाटली.

जादूगार विनोद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानावर आधारित जादूंचे २० प्रयोग दाखविले. सुमारे दोन तासांचे हे प्रयोग पाहण्यासाठी बालचमूंचा उत्साह ओसंडून वाहत होता. खुली विज्ञान प्रश्‍न मंजूषा कार्यक्रमात अचूक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १०० रुपये अशी दहा बक्षिसे देण्यात आली. ‘मेक ॲण्ड टेक’ कार्यशाळेत मुलांनी कागदाच्या सहाय्याने विज्ञानावर आधारित प्रयोग केले. प्रशांत अलिबागकर, प्रवीण नवले, काजल क्षीरसागर यांनी निरनिराळे प्रयोग समजावून सांगितले. केंद्राचे शैक्षणिक सहाय्यक सुनील पोटे यांनी संयोजन केले. युवा उद्योजक संकेत तुपे, केंद्राचे शिक्षणाधिकारी नंदकुमार कासार यांचे सहकार्य लाभले.

आठवडा बाजार 
नाणोली : बालदिनानिमित्त नाणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी आठवडा बाजार भरविला. आर्थिक व्यवहार, खरेदी-विक्रीबाबत माहिती व्हावी, यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. बाजारात भाजी, किराणा, खाद्यपदार्थाची दुकाने विद्यार्थ्यांनी मांडली होती. झाशीची राणी, महात्मा गांधी, पंडित नेहरू, दूधविक्रेते, दुकानदार आदींच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारल्या होत्या. मुख्याध्यापक अर्जुन सावंत, दयानंद काळे, संगीता गुजर, मनीषा गाडे, विद्या कवाष्टे, ज्योती माळी, हेलू गावित यांनी मार्गदर्शन केले.

शहरात बालदिन उत्साहात 
महापालिकेच्या प्राथमिक, माध्यमिक व खासगी शाळांमध्ये गुरुवारी (ता. १४) पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस अर्थात बालदिन उत्साहात साजरा झाला. विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 

‘एरोनॉटिकल शो’
चिंचवड येथील नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये मुलांना ‘एरोनॉटिकल शो’ची प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. संस्थेचे कार्यकारी संचालक विलास जेऊरकर, विश्वस्त डॉ. प्रिया गोरखे आदी उपस्थित होते.

ग्रंथालयाचा अनुभव  
चिंचवडगावातील क्रांतिवीर चापेकर विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी विश्वहिंदू परिषदेच्या धर्मगंगा सार्वजनिक ग्रंथालयाची पाहणी केली. व्यवस्थापक स्नेहा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. नरेंद्र पेंडसे यांनी विद्यार्थ्यांना महाभारत ग्रंथाचा इतिहास सांगितला. गिरिजा काळवीट, स्मिता कुलकर्णी, रवींद्र वाघुले यांनी विद्यार्थ्यांना खाऊ दिला. विद्यार्थी नीरज पवार, गिरिजा हिसवनकर, यश पाटील, शिक्षिका श्‍यामला वाघमारे यांनी नेहरूंविषयी माहिती सांगितली. गणेश शिंदे यांनी लहुजी वस्ताद साळवे यांच्या कार्याबद्दल माहिती सांगितली. मंजूषा गोडसे यांनी सूत्रसंचालन केले. सुधाकर हांडे यांनी आभार मानले. दीपाली नाईक, पुष्पा जाधव, शुभदा कानडे यांनी संयोजन केले.   

आकर्षक वेशभूषा 
पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचालित पी. के. इंटरनॅशनल इंग्रजी शाळेत शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे यांनी विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी एक मिनीट शो, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, अभिनय सादरीकरण, ओळखा पाहू मी कोण ? आदी कार्यक्रम झाले. मुख्याध्यापिका दीपाली जुगुळकर, संगीता पराळे, सविता आंबेकर उपस्थित होते. राखी पोरेल, अपर्णा काथवटे यांनी सूत्रसंचालन केले. कार्तिकी देशमुख यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com