सोबतच जगायचे खबरदारी घेऊन! ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटबाबत तज्ज्ञांचा सल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mask

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या ओमिक्रॉन सब व्हेरिएंटने डोके वर काढले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य आणि केंद्र सरकारनेही आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेतला आहे.

Omicron Variant : सोबतच जगायचे खबरदारी घेऊन! ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटबाबत तज्ज्ञांचा सल्ला

पुणे - चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या ओमिक्रॉन सब व्हेरिएंटने डोके वर काढले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य आणि केंद्र सरकारनेही आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेतला आहे. आपल्याला कायमच कोरोना सोबतच जगायचे असून, अनावश्यक भीती बाळगण्यापेक्षा आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. ‘बीएफ.७’ या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाच्या काळजीचा हा आढावा...

सध्याचे वास्तव

 • चीनमध्ये ओमिक्रॉनचा सब व्हेरिएंट ‘बीएफ.७’मुळे रुग्ण संख्या वाढली आहे

 • चीनने झीरो कोविड पॉलिसी अवलंबल्यामुळे नव्या व्हेरिएंचा प्रसार वाढला असल्याचे तज्ज्ञांचे मत

 • भारतात ऑक्टोबरमध्येच गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरने या व्हेरीएंटची बाधा झालेल्या तीन रुग्णांची पुष्टी केली होती

 • या व्हेरिएंटने बाधित रुग्ण लवकर बरे झाले होते

 • ‘सेल होस्ट ॲण्ड मायक्रोब’ या शोधपत्रिकेनुसार या व्हेरिएंट फार हानिकारक नाही

 • भारतात मोठ्या लोकसंख्येला कोरोना होऊन गेल्यामुळे, तसेच लसीकरणामुळे प्राथमिक स्तरावर आपल्या सर्वांना संरक्षण मिळाले आहे

बी.एफ.७ या व्हेरिएंटबद्दल

 • विषाणूच्या प्रसाराचा दर आणि आजाराच्या तीव्रतेबद्दल अजूनही शास्रीय विश्लेषण नाही

 • मोठ्या प्रमाणावर जनुकीय क्रमनिर्धारणानंतर शास्रीय विश्र्लेषणातून भारतातील आडाखे बांधता येतील

 • देशात जवळपास लसीकरण पूर्ण झाले असून, बूस्टर डोसही सुरू आहे

 • सध्यातरी लोकांमध्ये सिरोपॉझीटीवीटी मोठ्या प्रमाणार आहे

 • प्रत्येक राज्यात कोरोना विषाणूतील व्हेरिएंट तपासण्याची सुविधा आहे

जनुकीय क्रमनिर्धारण

1) प्रहरी सर्वेक्षण - केंद्र सरकारने पुन्हा एकदा जनुकीय क्रमनिर्धारण (जीनोम सिक्वेन्सिंग) करण्याचे आदेश दिले आहे. महाराष्ट्रातही या आधीच पाच प्रयोगशाळा आणि पाच रुग्णालयांची निवड प्रहरी केंद्र म्हणून करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रातून दर पंधरवड्याला १५ कोरोना बाधितांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) आणि राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था (एनसीसीएस) यांना पाठविले जात होते. आता पुन्हा ही प्रक्रिया सुरू होत आहे.

2) सर्वोच्च विज्ञान संस्थेचा सहभाग - वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) सहकार्याने विविध जीवशास्त्राच्या प्रयोगशाळांत कोरोना बाधितांचे नमुने तपासले जातात. याद्वारे जिल्ह्यातून १०० नमुन्यांची तपासणी केली जाते.

आपण काय करू शकतो?

 • लशीचा बूस्टर डोस तातडीने घ्यावा

 • गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणे, अंतर ठेवणे

 • लक्षणे दिसल्यास तातडीने निदान करा

 • घरात राहूनही कोरोना बरा होतो, अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या

 • अनावश्यक रुग्णालयात दाखल होणे टाळा

हे लक्षात ठेवा

 • १२ ते १८ वर्गातील युवा वर्गाने लसीकरण पूर्ण करावे

 • शाळा अथवा महाविद्यालयात कोरोना संबंधीच्या पंचसूत्रीचे काटेकोर पालन करा

 • कोरोना संबंधीची लक्षण दिसल्यास तातडीने विलगीकरण आणि उपचार घ्या

सध्या तरी देशात घाबरण्यासारखी स्थिती नाही. तरीही, ज्यांचे बूस्टर डोस राहिले आहेत. अशा सर्वांनी ते पूर्ण करावे. हे सर्व श्र्वसनमार्गाने पसरणारे विषाणू असून, नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा. सध्या तरी आपल्याकडे देशातील प्रसाराची माहिती नसल्याने कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत शासकीय माहितीचाच आधार घ्यावा.

- डॉ. प्रमोद जोग, राज्याच्या बालकांसाठीच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य

‘स्वास्थ्यम्’मधील बहुमोल मार्गदर्शन

१) ‘योगा’द्वारे मनाचा अनंताकडे प्रवास

योगगुरू श्री एम यांनी सांगितले आहे की, योग ही एक साधना असून, ज्याद्वारे व्यक्ती स्वतःला आत्मा म्हणून ओळखू शकते. योगसाधनेतून मर्यादित असलेले मन अमर्यादित होईल. म्हणून प्रत्येकाने योग करायला हवा. आपण अमर्यादित विचार केला, तर काहीही करू शकतो. या अमर्यादित क्षमतांना ओळखण्याची शक्ती आणि मुक्त आयुष्य जगण्याचा मंत्र योगाद्वारे मिळतो. संसारात राहून आयुष्यातील समस्यांचा सामना करत असताना योगाद्वारे मन स्थिर ठेवणे म्हणजेच योग.’’

२) ‘स्व’व्यवस्थापन ही पहिली पायरी

श्रीमद्‌भगवद्‌गीतेतील विचारांचा जगभरात प्रसार करणारे गौरांग दास यांनी सांगितले की, माणसाचे आपले शरीर आणि मन यावरील नियंत्रण सुटत चालले आहे. देशातील मोठ-मोठ्या व्यवस्थापन संस्थांमधून अर्थव्यवस्था, समस्यांच्या व्यवस्थापनाचे धडे दिले जात आहेत. पण, आपण आपले मन, इंद्रिये, सवयी आणि दिनचर्या याचे व्यवस्थापन कसे करायचे? याचे मूलभूत धडे गिरविण्याची वेळ आली आहे. स्व व्यवस्थापन ही व्यवस्थापनाची पहिली पायरी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

३) मनःस्वास्थ्य चांगले ठेवा

योगगुरू डॉ. हंसाजी योगेंद्र यांनी दिलेला सल्ला प्रत्यक्ष आचरणात आणण्यासारखा आहे. योगशास्त्र हा शिस्तीचा मार्ग आहे. रोजच्या घटनांतून आनंद घेत गेलात, तर निश्चितच ताणतणावापासून दूर राहाल. रोजचे काम केल्याने नुकसान होत नाही. मात्र राग, द्वेष आणि तणावाने मात्र नुकसान होते. विचार, जीवनानुभव आणि व्यवहारातून मनाची घडण होते. एखाद्या घटनेमुळे आपण चिडलो तर मनाचा तोल ढासळतो. त्यामुळे खाल्लेले अन्न एकतर जमा होते किंवा ते फेकले तरी जाते. चरबी, कोलेस्ट्रॉल आणि साखरेच्या रूपात ते साचले तर सहव्याधी जडतात. अन् फेकले गेले तर चेतासंस्थेवर परिणाम होत चित्त ढळले जाते.