खुल्या व्यापारनितीची आवश्यकता

खुल्या व्यापारनितीची आवश्यकता
Published on: 

शेंझेन (चीन), ता. १८ (पीटीआय) : आशिया-प्रशांत क्षेत्रात स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी अधिक खुली व्यापार व्यवस्था आवश्यक असल्याचे प्रतिपादन चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज केले. आशिया-प्रशांत आर्थिक सहकार्य (अपेक) शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर आयोजित उद्योजकांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत अमेरिकेचाही सहभाग असल्याने सर्व जगाचे लक्ष येथे होणाऱ्या चर्चेकडे लागले आहे.
फिलिपिन्समध्ये पार पडलेल्या ‘आसियान’ शिखर परिषदेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेदेखील आज शेंझेनमध्ये दाखल झाले. ट्रम्प यांचे ‘अमेरिका फर्स्ट’ धोरण आणि आयात शुल्कात केलेली वाढ ही ‘अपेक’च्या मुक्त व्यापार क्षेत्राच्या उद्दिष्टांच्या विरोधात मानली जात आहे. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी आवश्यक असलेल्या ‘एनव्हीडिया’ संगणक चिपसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर अमेरिकेने घातलेले निर्बंध चीनसोबतच्या तणावाचे मुख्य कारण ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर, जिनपिंग आणि इतर नेत्यांनी अमेरिकेचे थेट नाव न घेता बाजारपेठांच्या संरक्षणापेक्षा खुल्या दृष्टिकोनाचा पुरस्कार केला. जिनपिंग म्हणाले, ‘‘चीन केवळ आयात शुल्क कमी करणार नाही, तर बाजारपेठेतील प्रवेशाचा विस्तारही करेल. आम्ही नियम, कायदे आणि मानकांसारख्या आव्हानात्मक क्षेत्रांत सुधारणा करू.’’ चीनने जागतिक गुंतवणूकदारांसाठी परिस्थिती सुधारण्याचे आश्वासन दिले असून, जागतिक आर्थिक विकासात स्थिरता आणण्यासाठी चीन कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

बदलत्या भूमिका
वाढत्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात विविध देशांनी आपली धोरणे बदलण्यास सुरुवात केली आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी जिनपिंग यांची भेट घेऊन परस्परांच्या वस्तूंवरील आयात शुल्क कमी करण्यावर सहमती दर्शवली. ट्रम्प यांच्याशी असलेल्या संबंधांतील तणावामुळे कार्नी यांनी चीन आणि युरोपीय महासंघाशी आर्थिक संबंध दृढ करण्यावर भर दिला आहे. तसेच, मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी मोठ्या अर्थव्यवस्थांनी सर्वसमावेशक विकासाचे महत्त्व ओळखावे, असे आवाहन केले.

पुतीन यांचा निर्बंधांवर प्रहार
रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी २०१७ नंतर पहिल्यांदाच ‘अपेक’ परिषदेला प्रत्यक्ष उपस्थिती लावली आहे. युक्रेनवरील आक्रमणानंतर रशियावर लादण्यात आलेल्या निर्बंधांवर त्यांनी कडक शब्दांत टीका केली. आर्थिक वर्चस्व गाजवण्यासाठी वापरली जाणारे निर्बंध आणि व्यापार निर्बंधांसारखी साधने आता कालबाह्य झाली आहेत, असे पुतीन म्हणाले. रशियाने २०३५ मध्ये ‘अपेक’चे अध्यक्षपद भूषवण्यासाठी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. या परिषदेत गुरुवारी ट्रम्प, पुतीन आणि जिनपिंग यांच्यात होणाऱ्या त्रिपक्षीय चर्चेकडे जगाचे लक्ष लागले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत ६० टक्के वाटा असलेल्या २१ ‘अपेक’ देशांची ही चर्चा भविष्यातील आर्थिक दिशेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.