उपचारासाठी धावले पाटील

उपचारासाठी धावले पाटील

Published on

बळावलेल्‍या आजारावर माणुसकीची फुंकर

व्‍यसनाधीनतेमुळे झालेली चूक सुधारण्‍यासाठी चित्रसेनचा संघर्ष; जमली लाखाची मदत

गोंदवले, ता. २० : व्यसनाधीनतेमुळे आयुष्य अंध:कारमय झालेच; शिवाय गंभीर आजारही उद्‌भवला. अखेर चूक लक्षात आल्यानंतर त्‍यातून सावरून पुन्हा उभारी घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या चित्रसेन मुकेच्‍या आजारावर माणुसकीने फुंकर घातल्‍याची घटना समोर आली.
त्‍याचे झाले असे, की गोंदवले बुद्रुक येथील चित्रसेनचा आजार अधिकच बळावला. तो अंथरुणावर खिळून असल्याने सर्वांनीच आशा सोडली. याच परिस्थितीत महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील त्‍याच्‍या मदतीला धावले. रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याच्यावर तत्काळ शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यासाठीचा खर्चही मोठा असल्याने ग्रामस्थांना मदतीचे आवाहन करताच लाखाहून अधिक रक्कम जमा झाली आणि उपचाराचा मार्ग मोकळा झाला.
चित्रसेनची व्यसनाधीनता वाढत गेल्याने त्याचे आरोग्य ढासळत गेले. गंभीर आजाराने तो पूर्णपणे खिळून गेला. घरी अंथरुणावर पडून असलेल्या त्याच्या शरीरात उरलेली शक्ती दिवसेंदिवस संपत चालली. डॉक्टरांनीही परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याचे सांगितले होते. गावकरी, नातेवाईक, कुटुंब सर्वजण हताश झाले होते; पण याच अंध:कारात मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील मदतीसाठी धावून आले. चित्रसेनला मृत्यूच्या दारातून परत आणायचे, त्याचा जीव वाचवायचाच, हा निर्धार करून त्यांनी तत्काळ पावले उचलली.
शुद्ध हरपलेला आणि श्‍‍वासोच्‍छवासही मंद झालेल्या अवस्थेत त्याला हातावर उचलून धैर्यशील पाटील यांनी गुरुवारी रात्री दहिवडीतील खासगी रुग्णालयात दाखल करताच तातडीचे उपचार सुरू झाले. चार दिवसांतच चित्रसेनच्या प्रकृतीत सुधारणा दिसू लागली. कुटुंबीयांसह सर्वांच्याच डोळ्यात आशेची झलक उमटली; परंतु डॉक्टरांनी हृदयाची तत्काळ शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे सांगितल्याने सर्वजण पुन्हा चिंतेत गेले.
आर्थिक परिस्थिती दुर्बल असल्याने हा लाखोंचा खर्च उचलणे अशक्य होते; पण धैर्यशील पाटलांनी हार मानली नाही. त्यांनी स्वखर्च केलाच; शिवाय गावकऱ्यांना व लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले. त्यांच्या या भावनिक हाकेला साद घालत काही तासांतच लाखाहून अधिक रक्कम जमा झाली.
गावाने दाखवलेल्या एकता आणि मानवतेच्या या मदतीमुळे चित्रसेनला तत्काळ पुढील उपचारासाठी पुण्यातील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात यश आले आहे. चित्रसेन पुन्हा लवकरच सुस्थितीत घरी येईल, अशी कुटुंबीयांसह ग्रामस्थांकडून आशा व्यक्त होत आहे.
-----------------------------
पुन्‍हा उभे राहण्‍याचा निर्धार
चित्रसेनच्या वडिलांचे गेल्या वर्षभरापूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावरच आहे. मात्र, दुर्धर आजाराने ग्रासल्याने कुटुंबीयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याच्या उपचारासाठी हातातील सर्वच पुंजी खर्ची पडल्याने कुटुंबीय हतबल झाले आहेत. मात्र, धैर्यशील पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी केलेल्या मदतीने आता तो पुन्हा उभा राहणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
-------------------------------
राजकारण, पद, पक्ष हे सगळं नंतर. एखाद्या कुटुंबाच्या घरात पुन्हा दिवा पेटतो तेव्हा त्या आनंदाशी कोणतीच गोष्ट तुलना होऊ शकत नाही. चित्रसेनला पुन्हा आयुष्य मिळणं म्हणजे आपल्या प्रत्येकाचा विजय आहे.
-धैर्यशील पाटील,
जिल्‍हाध्‍यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सातारा.
..................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com