ढेबेवाडी भूकंपग्रस्त चोरगेवाडी झाली अतिक्रमणीत
भूकंपग्रस्त चोरगेवाडी झाली अतिक्रमित
वनखात्याकडील तब्बल ५८ वर्षांचा प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी; ग्रामस्थांचे पालकमंत्र्यांना साकडे
ढेबेवाडी, ता. २५ : सुमारे ५८ वर्षांपूर्वी पाटण तालुक्याला बसलेल्या भूकंपाच्या जोरदार धक्क्याने भूस्खलन होऊन घरांची पडझड झाल्याने जवळच्याच वनहद्दीतील जागेत स्थलांतरित होऊन घरे बांधून शेतीही विकसित केलेली चोरगेवाडी (काळगाव, ता. पाटण) हे गाव आता वनखात्याच्या रेकॉर्डला अतिक्रमित ठरले आहे. त्यामुळे गावकरी काळजीत पडले आहेत. हे अतिक्रमण पात्र ठरवून नियमित करण्यात यावे, यासाठी त्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना साकडे घातले आहे.
याबाबत चोरगेवाडी ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातील माहितीनुसार, काळगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत मालकी क्षेत्रातील डोंगरातील दरडीला पूर्वी स्थापित झालेली चोरगेवाडी ही १७ कुटुंबांची वाडी होती. १९६७ मध्ये झालेल्या भूकंपात तेथे भूस्खलन होऊन घरांची पडझड झाल्याने नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. इतर ठिकाणी जागा नसल्याने चोरगेवाडीतील कुटुंबांनी जवळच्याच वनहद्दीतील जागेवर स्थलांतर करून घरे बांधून शेतीही विकसित केली. तिथे नव्याने विकसित केलेल्या या गावची सध्याची घरे व कुटुंबांची संख्याही मधल्या काळात वाढली आहे. दरम्यान, तब्बल ३५ वर्षांनंतर म्हणजे २००३ मध्ये संबंधित कुटुंबांवर वनजमिनीवर शेती व घरासाठी अतिक्रमण केल्याचा गुन्हा प्रथमच नोंदविला गेला. त्यानंतर अनेकदा चौकशी, तपासण्या होऊनही हे अतिक्रमण पात्र करून नियमित केलेले नाही. सध्या अतिक्रमणातील घरांच्या नोंदी अतिक्रमणधारकाच्या नावे काळगाव ग्रामपंचायतीकडे केल्या असून, संबंधित खातेदार त्याचा घरफळाही भरतात. त्यांना वीज कनेक्शनही दिली आहेत. फक्त तेथील जमिनीची नोंद सातबाऱ्याला झालेली नाही. मात्र, शेतकरी ती कसून धान्य पिकवीत आहेत. या सर्व बाबींचा विचार करून हे अतिक्रमण पात्र होऊन त्यावरील खातेदारांची नावे नियमित करण्याबाबत चोरगेवाडी ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांना साकडे घातले आहे. यासंदर्भात काळगाव ग्रामपंचायतीने केलेला ठराव तसेच घरांचे उतारे व अन्य कागदपत्रेही त्यांनी निवेदनासोबत जोडलेली आहेत.
(चौकट)
लोकनेत्यांचे नातू नक्की न्याय देतील...
पाटण तालुक्यात १९६७ मध्ये बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याने मोठी हानी झाली. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. त्यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई यांचेही प्रयत्न तालुक्याच्या नव्याने उभारणीत खूप महत्त्वपूर्ण ठरले. तालुकावासीय आजही त्यांची आठवण काढून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतात. चोरगेवाडीतील ग्रामस्थही त्यांच्याविषयीच्या भूकंपकाळातील आठवणी आजही सांगतात. लोकनेत्यांचे नातू असलेले पालकमंत्री शंभूराज देसाई हा प्रश्न ताकदीने सोडवतील, असा विश्वास तेथील ग्रामस्थांना आहे.
(फोटो)
08152
चोरगेवाडी (काळगाव) : वनहद्दीतील जमिनीवर गाव वसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

